`राम-लीला` प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहात जाळपोळ

कडेकोट पोलीस सुरक्षेचा दाव्याला फोल ठरवत सोमवारी काही जणांनी ‘राम-लीला’ हा सिनेमा सुरू असलेल्या सिनेमाघरांत तोडफोड केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 19, 2013, 10:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अलीगड/कानपूर
कडेकोट पोलीस सुरक्षेचा दाव्याला फोल ठरवत सोमवारी काही जणांनी ‘राम-लीला’ हा सिनेमा सुरू असलेल्या सिनेमाघरांत तोडफोड केली. बजरंग दल आणि केसरिया वाहिनीशी संबंधित असणाऱ्या काही जणांनी ही तोडफोड केल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे कानपूरमध्ये या वादग्रस्त सिनेमाविरुद्ध कथित हिंदूत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी सिनेमाघरांबाहेर प्रदर्शनं केली.
‘मीनाक्षी सिनेमा हॉल’च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सुरक्षा व्यवस्था असतानाही काही जण हॉलमध्ये जबरदस्तीनं घुसले आणि काही खुर्च्या तोडून त्यांना आग लावून दिली गेली. यामुळे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु आग वेळीच आटोक्यात आणली गेल्यानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांच्या बेजबाबदारपणाविरुद्ध घोषणाबाजीही केली. थोड्या व्यत्ययानंतर पुन्हा सिनेमा सुरू करण्यात आला.
रविवारीही इथल्या दोन चित्रपटगृहांत अशाच घटना घडल्या होत्या. परंतु, यासंबंधी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही चित्रपटगृहांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.