बॉलिवूडच्या बादशहानं चोरलं हॅरी पॉटरच्या लेखिकेचं भाषण?

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननं हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिचं भाषण चोरल्याचा आरोप होतोय. शाहरुखनं ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 7, 2013, 01:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रेशम सेंगर, नवी दिल्ली
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननं हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिचं भाषण चोरल्याचा आरोप होतोय. शाहरुखनं ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.
सोशल मीडिया सल्लागार आणि ब्लॉगर असलेल्या अॅग्राथा दिनाकरन हिनं शाहरुखवर भाषण चोरल्याचा आरोप केलाय. शाहरुखनं रोलिंग यांच्या भाषणातील अनेक वाक्य जशीच्या तशी स्वतःच्या भाषणात वापरली आहेत, असंही अॅग्राथा दिनाकरन यांनी सांगितलं.
रोलिंग यांनी सप्टेंबर २००८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात केलेल्या भाषणाची नक्कल शाहरुखनं केली. मूळ भाषण चोरुन त्यात शाहरुखनं किरकोळ बदल केले. सुधारित भाषण त्यानं स्वतःचे विचार म्हणून एआयएमएच्या कार्यक्रमात सादर केले, असं अॅग्राथा दिनाकरन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.
शिवाय रोलिंग यांनी आपल्या भाषणात दारिद्र्य, घटस्फोट, यशापयशाबद्दल मांडलेली मतं शाहरुखनं मांडली असा आरोप करण्यात आलाय. आपल्या ब्लॉगमध्ये शेवटी याला जबाबदार कोण असा सवाल करत अॅग्राथा दिनाकरन यांनी लिहीलं, की “आपलं भाषण तपासून न पाहणारा शाहरुख की दुसऱ्याचं वाङमय चोरणारी व्यक्ती ज्यानं हे भाषण शाहरुखसाठी लिहीलं”.
एकूणच आता शाहरुख खान यावर काय उत्तर देतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.