धोनी आता केवळ तीन पावलं दूर....

टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्समधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं कोणी विचारलं तर बहुतेक जण कॅप्टन कूल धोनीचचं नाव घेतील.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 14, 2012, 03:29 PM IST

www.24taas.com
टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्समधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं कोणी विचारलं तर बहुतेक जण कॅप्टन कूल धोनीचचं नाव घेतील. वनडे आणि टी-20मधील आकडे सुद्धा तेच सिद्ध करतात. दडपण कितीही असो कॅप्टन कूल शांतचित्तानं निर्णय घेतो, कदाचीत हेच त्याच्या यशाचं गमक...
दक्षिण आफ्रिकेत झालेली पहिल्यावहिली टी-20 चॅम्पियनशिप आणि 28 वर्षांनंतर भारताने जिंकलेला वर्ल्ड कप यासारखे रोमहर्षक क्षण भारतीय क्रिकेटला मिळाले ते धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे. फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्लब क्रिकेटमध्ये सुद्धा दोन वेळा आयपीएल आणि एकदा चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला जिंकून देत आपणचं सर्वोत्तम कॅप्टन असल्याच सिद्ध केलं. भारताचा हाच कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमध्ये कस लागणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा यशस्वी कॅप्टन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. धोनीला सौरव गांगुलीच रेकॉर्ड मोडून यशस्वी कर्णधारच्या यादीत जाण्यासाठी अजून 3 टेस्ट मॅचेस जिंकण्याची आवश्यकता आहे.
सौरव गांगुलीने 49 टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. त्यात भारताने 21 विजय, 13 पराभव आणि 15 मॅचेस ड्रॉ केल्या..... दादाच्या कॅप्टनशीपखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एडलेड टेस्टमध्ये केलेला पराभव आणि पाकिस्तानला त्यांच्या भूमीत चारलेली धूळ असे ऐतिहासीक क्षण नेहमीच लक्षात राहतील.....
धोनीच्या कॅप्टन्सी रेकॉर्डवर नजर टाकली, तर त्याला 2008 साली कॅप्टनसी मिळाली. धोनीच्या कॅप्टनसी खाली खेळताना भारताने 39 सामन्यात 19 विजय मिळावले तर 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि 10 टेस्ट ड्रॉ झाल्या.
घरच्या मैदानात खेळताना तर धोनीचे नेतृत्व वाखणण्याजोगं आहे. भारताने 20 मॅचेस पैकी तब्बल 14 मॅचेस जिंकल्या आणि फक्त 1 मॅचमध्ये पराभव पत्करला... मात्र भारताबाहेर इंग्लंड विरुद्ध 4 आणि ऑस्ट्रेलीया विरुद्ध 4 अशा लागोपाठ 8 टेस्टमध्ये पराभवाची नामुष्की धोनीच्याच नेतृत्वाखाली आली..... असं असलं तरी भारताने धोनीच्या कॅप्टनसी खाली भारतीय जमिनीवर एकही टेस्ट सीरीज गमावली नाही.....त्यामध्ये सेहवाग, द्रविड, सचिन, लक्ष्मण, झहीर, हरभजन यांच विजयातील योगदान विसरुन चालणार नाही....... टीम इंडियाला जिंकण काय असतं हे खर दादाने शिकवलं.......त्याचा पाया दादाने रचला आणि आता त्यावर कळस चढविण्याचा फक्त ३ पावलं दूर धोनी आहे.
भारताच्या पुढील सीरीजवर नजर टाकली तर आपल्याला इंग्लंड विरुद्ध 4 आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 अशा तब्बल 8 मॅचेस घरच्या मैदानावर खेळायच्या आहेत, त्यामुळे टीम इंडियाचा हा कॅप्टन कूल लवकरच सर्वात यशस्वी होऊन आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवेल असंच दिसतय...