विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज

आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.

Updated: Nov 1, 2011, 06:28 AM IST

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ

विदर्भ आणि शेतक-यांच्या आत्महत्या हे जणू समीकरणच बनलंय. शेतीमालाला भाव नाही,  कर्जबाजारीपणा आणि त्यातूनच घरातल्या कर्त्या पुरुषानं पत्करलेला आत्महत्येचा मार्ग. त्यातच राज्यकर्त्यांनी केलेल्या दुर्लक्ष्यामुळं शेतक-यांच्या अनेक कुटुंबांना कुणाचाच आधार मिळेनासा झाला आहे. यवतमाळच्या दीनदयाळ मंडळानं अशाच काही कुटुंबांसाठी एक अनोखा उपक्रम राबवलाय. आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. अनेक सरकारी अधिकारी,व्यापारी कार्यकर्त्यांनी आपली नोकरी व्यवसाय सांभाळून या शेतकरी कुटूंबांचं  दायित्व स्विकारलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.या कौटुंबिक उपक्रमातून शेतकरी विधवांनी अंधारातून प्रकाशाकडे जात असल्याचा आनंद व्यक्त केला.

 

भावाच्या ओवाळणीतून या महिलांना साडीचोळी आणि शुद्ध पाणी मिळावं म्हणून वॉटर फिल्टर तसंच आर्थिक मदतही देण्यात आली.वर्षभर या कुटूंबासाठी आरोग्य तपासणी,मुलामुलींसाठी छात्रावास असे उपक्रमही दिनदयाळ मंडळाने राबविण्याचं ठरवलंय.

 

शेतकरी विधवांना शासनाकडून नेहमीच पोकळ आश्वासन मिळतात. मात्र ख-या अर्थानं भावनिक,मानसिक आणि, आर्थिक आधार दिल्यानं शेतक-यांचं कुटूंब ख-या अर्थानं उजळून निघालंय. दिनदयाळ मंडळाने हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.