पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...

पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता... मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...

Updated: May 24, 2012, 12:57 PM IST

www.24taas.com

 

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल दरवाढीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापूर, सातारा सांगलीमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्याच्या इतर भागातही दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. पुणे नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातही विविध पक्षांतर्फे राज्यात आंदोलन सुरू झालंय. तर आरपीआयकडून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.

 

मुंबई-गोवा महामार्ग

शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको केलाय. कणकवली इथं रस्ता रोखून धरलाय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. राज्यभरात शिवसेनेनं पेट्रोल दरवाठीविरोधात आंदोलन सुरु केलंय, त्याचाच हा एक भाग आहे. पेट्रोलचे दर तब्बल साडेसात रुपयांना वाढवल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय.

 

नागपूर

नागपूरमध्येही पेट्रोलदरवाढीविरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली. भंडारा-नागपूर एसटी बसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काचा फोडल्यात. जगनारे चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यांच्या गाडीवरील लाल दिवा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केलीय.

 

पुणे

राज्यभर पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन सुरु आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात भाजपनं पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलंय.  दरवाढीविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत.

 

औरंगाबाद

औरंगाबादेतही पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सरकारने दरवाढ मागे घेतली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलय. यावेळी शिवसेनेनी हातांनी गाड्या ढकलण्याचे आंदोलनही केलं. आणि गाड्या ढकलण्यात जिंकलेल्या व्यक्तीला 5 लीटर पेट्रोल बक्षीसही देण्यात आलं.. पेट्रोल विकत घेणे आता शक्य नसल्यामुळे गाड्या ढकलूनच चालवाव्या लागतील असे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

कोल्हापूर

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. सकाळपासूनच शहरातली बाजारपेठ बंद असल्याचं चित्र आहे. तर भाजपच्या वतीनंही निदर्शनं करण्यात येणार आहेत. पेट्रोल दरवाढीच्या निषेघार्थ राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी दिलेत.

 

सांगली

सांगलीतही पेट्रोलच्या दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. शहरातल्या सर्वच मुख्य बाजारपेठा बंद आहेत. वारंवार होणाऱ्या दरवाढीला सामान्य नागरिक कंटाळलेले असल्यानं बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसतंय.