भारतीय खेळाडूने ‘ती’च्याबरोबर रात्र जागवली होती – बिंद्रा

२०१०च्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या एका खेळाडूने हॉटेलातील आपल्या रूमवर महिला बोलावून तिच्याबरोबर रात्र जागवली होती.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 3, 2013, 08:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंदिगड
२०१०च्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या एका खेळाडूने हॉटेलातील आपल्या रूमवर महिला बोलावून तिच्याबरोबर रात्र जागवली होती. श्रीलंकन पदाधिकाऱ्यांनी ‘मॅनेज’ करून त्या खेळाडूला आणि त्या भारतीय पदाधिकाऱ्याला वाचविण्याचे काम ‘बीसीसीआय’च्या धुरिणांनी केले होते, असा गौप्यस्फोट पंजाब क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आय.एस. बिंद्रा यांनी करून ‘बीसीसीआय’च्या एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
२०१० साली भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा त्या दौऱ्यावर ‘लिट्टे अभियाना’साठी श्रीलंकेचे सेवानिवृत्त जनरल यांच्याकडे भारतीय संघाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
या सेवानिवृत्त जनरल यांनी त्यावेळी ‘चिरेबंदी सुरक्षा’ पुरविली होती. हॉटेलच्या प्रत्येक छतावर तसेच लॉबीमध्ये ‘सीसी टीव्ही यंत्रणा’ बसविण्यात आली होती. त्यावेळी संघाबरोबर गेलेला एक अधिकारी एका तरुणीला घेऊन एका भारतीय खेळाडूच्या रूममध्ये गेला होता. हा खेळाडू गेले सहा मोसम आयपीएलमध्ये ‘चेन्नई सुपरकिंग्ज’चा प्रमुख सदस्य आहे, असे बिंद्रा यांनी स्पष्ट केले.
हे सर्व प्रकरण ‘सीसी टीव्ही यंत्रणे’त कैद झाले आहे. ही तरुणी त्या रात्री ‘त्या’ खेळाडूच्या रूमवर राहिली अन् त्या तरुणीला ज्या व्यक्तीने त्या खेळाडूच्या रूमवर पाठविले ती व्यक्ती ‘आयसीसी’च्या संदिग्ध सट्टेबाजांच्या सूचीमध्ये सामील आहे. हे सर्व प्रकरण म्हणजे भ्रष्टाचारविरोधी नियमांची क्रूर चेष्टा करण्यासारखेच आहे, असे सूतोवाच करून पंजाब क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आय.एस. बिंद्रा यांनी एका नव्या वादालाच तोंड फोडले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.