या, मला आपल्याशी बोलायचंय! राज ठाकरे नरमले!

`या, मला आपल्याशी बोलायचंय`, अशी हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला घातलीय. नेहमी खळ्ळ खट्ट्याकची भाषा वापरणारे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळं `थंड` पडल्याचं दिसतंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 29, 2014, 06:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`या, मला आपल्याशी बोलायचंय`, अशी हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला घातलीय. नेहमी खळ्ळ खट्ट्याकची भाषा वापरणारे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळं `थंड` पडल्याचं दिसतंय.
राज यांचे लोकांना विनवणी करणारे हे बॅनर सध्या मुंबई, ठाण्यात झळकले आहेत. `३१ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला या, मला आपल्याशी बोलायचंय...` असं आर्जव राज यांनी केलं आहे. मनसेच्या या मवाळ स्वरामुळं चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईतील सोमय्या हॉस्पिटल मैदानावर संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दहा उमेदवार उतरवून राज यांनी शिवसेनेला आव्हान दिलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. एवढंच नाही तर दहाच्या दहाही जागांवरच मनसेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. या मानहानीकारक पराभवानंतर राज यांनी मौन बाळगलं होतं. त्यावरूनही राज यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू होता. अखेर पक्षांतर्गत बैठकांनंतर ३१ मे रोजी जाहीर सभा घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे.
आता विधानसभेची रणनिती ठरवण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यासाठी ते येत्या 31 तारखेला सभा घेणार आहेत. आता या सभेत राज ठाकरे काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ