ऑडिट मतदारसंघाचं : जालना

ऑडिट मतदारसंघाचं : जालना

Updated: Apr 4, 2014, 03:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जालना
जालना आणि सोने का पालना अशी म्हण मराठवाड्यात प्रचलित आहे... जालना शहरातील स्टीलचे कारखाने आणि बाजारपेठेतील उलाढालींमुळं ही म्हण रूढ झाल्याचं सांगितलं जातं... पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.  जालना शहर विकासापासून कोसो मैल दूर आहे.. मराठवाड्याची राजधानी मानल्या गेलेल्या औरंगाबादच्या जवळ असूनही, जालनाचा पाळणा काही हललेला नाही.
जालना लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, 1977 पासून मात्र जनसंघ आणि नंतर भाजपचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलंय.
1957 च्या लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसचे त्याबजी सैफ खासदार होते, तर  1962 मध्ये रामराव नारायणराव खासदार होते. 1967 ला काँग्रेसतर्फे  व्ही.एन. जाधवांनी प्रतिनिधीत्व केलं तर 1971 ला बाबुराव काळे खासदार झाले. आणिबाणीनंतर मात्र चित्र बदललं. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघातर्फे  पुंडलिक दानवेंनी लोकसभा गाठली. त्यानंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात ठेवला. 
1980 आणि 1984 मध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब पवारांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं. 1989 मध्ये पुन्हा भाजपच्या पुंडलिक दानवेंनी दुस-यांदा लोकसभा गाठली. 1991 मध्ये काँग्रेसचे अंकुशराव टोपें खासदार झाले. उत्तमसिंग पवार हे 1996 आणि 1998 मध्ये भाजपच्या तिकीटावर सलग दोनदा खासदार झाले. त्यानंतर 1999,2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सलग तीनदा  भाजपचे रावसाहेब दानवे खासदार म्हणून विजयी झाले.
जालना लोकसभा मतदारसंघात एकूण  14 लाख 26 हजार 255 मतदार आहेत.. त्यात 7 लाख 43 हजार 453 पुरुष मतदार आहेत, तर 6 लाख 72 हजार 302 महिला मतदार आहेत.. 
जालना मतदारसंघाचा काही भाग औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदार संघात येतात....एकूण मतदारांपैकी 75 हजार मतदार हे औरंगाबाद  परिसरातील आहेत.. त्यामुळे औरंगाबादमधील मतदारांवर येथील खासदाराचं भविष्य निर्भर असणार....शिवाय रावसाहेब दानवेंची सद्दी संपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कामाला लागले आहेत.
मतदारसंघातील सर्वच नगरपालिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यानं भाजपला धक्का बसला असला, तरी लोकसभा जिंकणारच हा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे भाजप गड राखणार की काँग्रेस पुन्हा सुरुंग लावणार याकडे आता लक्ष लागलंय.
जालन्यातून सलग दोनदा आमदार आणि आता सलग दोनदा खासदार बनलेल्या रावसाहेब दानवेंची ओळख करून घेऊयात
सलग दोनदा खासदार बनलेल्या रावसाहेब दानवेंची ओळख
 नाव -  रावसाहेब दादाराव दानवे
 जन्म  - 18 मार्च 1955
 वय - 58
 शिक्षण - पदवीधर (कॉमर्स )
 
ग्रामीण भागाची नाळ ओळखणारे आणि त्यांच्यातच रमणारे खासदार रावसाहेब दानवे. विद्यार्थी जीवनात आणिबाणीच्या काळात रस्त्यावर उतरले आणि तेथून सुरु झाला त्यांचा राजकीय प्रवास.
ग्रामीण भागात कमवलेले कार्यकर्ते ही त्यांची संपत्ती असल्याचं ते मानतात. या काळात दानवेंनी भाजपचं कमळ गावागावात पोहोचवलं आणि त्यातूनच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना 3लाख 50 हजार 710 मतं पडली तर काँग्रेसच्या कल्याण काळेंना 3 लाख 42 हजार 228 मतं पडली. म्हणजे दानवे अगदी काठावर 8 हजार 482 मतांनी विजयी झाले.
खरं तर दानवेंनी शहरी भागाकडे दुर्लक्ष करीत आपला ग्रामीण भागातला संपर्क दांडगा ठेवलाय. तेच त्यांच्या यशाचं इंगित असल्याचं मानलं जातं.
 
राजकारणाव्यतिरिक्त दानवेंना व्यायाम करायला आवडतं, जुनी गाणी ऐकायला आवडतात, शेतीत रमणं आणि काम करणं त्यांची आवडती कामं आहेत.
शेतात रमणा-या दानवेंपुढे आता दुष्काळाच्या वणव्यानंतर पुन्हा एकदा भाजपचं कमळ जालन्यात फुलवण्याचं खडतर आव्हान असणार आहे.

मतदारसंघाच्या  समस्यांवर नजर
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे हे शहरवासियांचे नव्हे, तर केवळ ग्रामीण भागाचेच खासदार असल्याचा  आरोप होतोय.. औद्योगिक नगरी असलेला जालना पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा असलेल्या या मतदारसंघाच्या  समस्यांवर नजर टाकूयात..
स्टील उत्पादनासाठी प्रसिध्द असलेला जालना लोकसभा मतदारसंघ अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलाय. एकीकडे शहरातलं नागरिकीकरण वाढतंय आणि दुसरीकडे  ग्रामीण भागातील जनतेला मात्र, पायाभूत सुविधांसाठी अक्षरशः झगडावं लागतंय.
अरूंद आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते,