पेडर रोडसाठी आम्ही बेडर.....

नितीन सरदेसाईपेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

Updated: Dec 9, 2011, 10:28 AM IST

नितिन सरदेसाई, मनसे आमदार

 

पेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली अनेक दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

 

मा. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा अनेकांनी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी तेथील राहणाऱ्या मुठभर लोकांसाठी अनेकांना वेठीला धरले जाऊ नये असे म्हटले होते. त्यामुळे मुळातच कुठेही त्यांनी मंगेशकर कुटूंबियांना अजिबात सुनावले नव्हते. ज्यांना आता ते शब्द झोंबले ते मात्र चवताळून निघाले. आणि त्यामुळेच राजकीय प्रसिद्धीसाठी असेल किंवा अजून काही माहित नाही मात्र त्यासाठी त्यांनी मंगेशकर कुटूंबिय आणि सचिन तेंडूलकर यासारख्या मान्यवरांचा उल्लेख करून पेडर रोडच्या उड्डाणपूलाचा विषय अगदीच प्रतिष्ठेचा केला.

 

मुंबई आज अनेक उड्डाणपूल आहेत. त्यामुळे अश्या उड्डाणपूलाचा विषयावरून राजकारण केलं जातंय हीच एक शोकांतिका आहे. उड्डाणपूल व्हावा कि नाही हे सरकारने ठरवावं मात्र काही मूठभर लोकांसाठी लाखो लोकांच्या वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत असल्यास मनसे कधीही गप्प बसणार नाही. सामान्यांना होणारा त्रास हे सामान्यांनाच ठाऊक आहे. उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्यांना त्यांची झळ जोवर पोहचत नाही तोपर्यंत त्यांना सामान्यांचा समस्या कधीच समजू शकत नाही.

 

अनेक लोकांना असेही वाटू शकते की निवडणूकीच्या तोडांवर मुंबईतील प्रश्नांना हात घालून मनसे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तर अशा लोकांना सांगावसं वाटतं की बाबांनो मनसेला चर्चेत राहण्यासाठी अश्या काही प्रश्नांची मुळीच गरज नसते. सामान्यांचा प्रश्नासाठी लढा देणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळेच पेडर रोड उड्डाणपूलाच्या प्रश्न हा सामान्य लोकांचा दृष्टीने कसा सोयीस्कर होईल असा मनसे आपल्या वतीने प्रयत्नशील असणार आहे.

 

शब्दांकन- रोहित गोळे