दीपक भारद्वाज हत्येसाठी दोन करोडची सुपारी!

अरबपती बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक यांच्या हत्येसाठी दोन करोड रुपयांची सुपारी दिली गेली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 2, 2013, 12:38 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरबपती बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक यांच्या हत्येसाठी दोन करोड रुपयांची सुपारी दिली गेली होती. या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या शार्प शूटर पुरुषोत्तम यानं या गोष्टीचा खुलासा केलाय. पण, पुरुषोत्तम सतत आपला जबाब बदलत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
दीपक भारद्वाज हत्या प्रकरणात या प्रकरणात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलीय. राकेश, अमित, पुरुषोत्तम आणि सुनील अशी या चौघांची नावं आहेत. यापैकी प्रदीप नावाच्या व्यक्तीवर शूटर्सना हत्यारं पुरवल्याचा आरोप आहे. तर इतर दोन जण आत्मसमर्पणासाठी आले होते. पण कोर्टात जाण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम राणा याला ताब्यात घेतलं. त्याला पटियाला हाऊसच्या परिसरात अटक करण्यात आलीय. दुसरा आरोपी सुनीलनं मात्र पोलिसांपासून वाचून कोर्टाच्या परिसरात प्रवेश केला. परंतू न्यायाधिशांनी त्याचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. दरम्यान, या प्रकरणात भारद्वाज यांच्या मोठ्या मुलाचीदेखील पोलिसांनी कसून चौकशी केलीय.

स्थानिक बसपा नेते दीपक भारद्वाज यांची २६ मार्च रोजी दक्षिण दिल्लीस्थित फार्महाऊसमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. राणासहीत तीन लोकांनी गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येतंय. भारद्वाज हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले होते.