सुषमा स्वराज यांच्या भाषणाने अडवाणी भावुक

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज लोकसभेत खूप भावुक झाले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर अडवाणी भावुक झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 

Updated: Aug 12, 2015, 05:27 PM IST
सुषमा स्वराज यांच्या भाषणाने अडवाणी भावुक  title=

नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज लोकसभेत खूप भावुक झाले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर अडवाणी भावुक झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 

सुषमा स्वराज भाषण करत असताना अडवाणी त्यांच्या शेजारी बसले होते. भाषण सुरू असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.  सुषमा स्वराज यांचे भाषण झाल्यानंतर अडवाणी यांनी त्या खाली बसण्यापूर्वी त्यांची पाठ थोपटली. ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेसने केलेल्या आरोपाला अत्यंत मुद्देसूद उत्तर दिल्यामुळे अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांची पाठ थोपटली. 

अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांचे भाषण सुरू असताना अत्यंत शांतपणे सर्व काही ऐकले. तसेच त्यांनी काही मुद्देही स्वराज यांना दिले. 

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराज यांना घेरले असता स्वराज यांनी आपला मोर्चा गांधी परिवाराकडे वळविला आणि ललित मोदी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. 

राजीव गांधीवर साधला निशाणा 
 
काँग्रेस पक्षाला टार्गेटवर घेताना सुषमा स्वराज म्हणाल्या, काँग्रेस सरकारमध्ये अनेक चुकीच्या माणसांना फायदा देण्यात आला. बोफोर्स प्रकरणातील आरोपी क्वात्रोकी आणि भोपाळ गॅस प्रकरणातील आरोपी वॉरेन अँडरसनला गुपचूप सोडण्यात आले. राजीव गांधी यांनी आपला मित्र आदिल शहरयारला वाचविण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. 

राहुल गांधींना काँग्रेसचा इतिहास वाचण्याचा सल्ला 
सुषमा स्वराज यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सुट्टीवरून टार्गेट करत म्हटले की, राहुल गांधी सुट्टीसाठी परदेशात जातात. त्यावेळी आपल्या कुटुंबाचा इतिहास वाचावा. राहुल गांधी मला विचारतात किती पैसे घेतले, राहुल गांधी यांनी आपल्या आईला विचारावे क्वात्रोकीला सोडण्यासाठी किती पैसे घेतले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.