विरुच्या ट्विटनंतर गुरमेहरची आंदोलनातून माघार

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध छेडलेल्या आंदोलनातून स्वत:ला वेगळं केलंय. 

Updated: Feb 28, 2017, 11:52 AM IST
विरुच्या ट्विटनंतर गुरमेहरची आंदोलनातून माघार title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध छेडलेल्या आंदोलनातून स्वत:ला वेगळं केलंय. 

दिल्लीच्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर सुरू केलेल्या आंदोलनामुळे गुरमेहर अचानक चर्चेत आली होती. एका शहिदाची मुलगी असलेल्या 20 वर्षीय गुरमेहरनं 'माझ्या वडिलांना पाकिस्ताननं नाही तर युद्धानं ठार केलंय' अशा आशयाचं ट्विट केलं होतं. यानंतर ट्विटरवर अनेकांना तिच्यावर टीका केली.

गुरमेहरला ट्रोल करणाऱ्यांमध्ये क्रिकेटर विरेंद्र सेहवाग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, अभिनेता रणदीप हुडा यांचाही समावेश होता. तर रॉबर्ट वढेरा, अरविंद केजरीवाल यांनी तिला समर्थन दिलं होतं. 

यानंतर मंगळवारी सोशल मीडियावर 'मी स्वत:ला या कॅम्पेनपासून वेगळी करतेय. सगळ्यांना शुभेच्छा. मी विनंती करते की मला एकटं सोडा... मला जे म्हणायचं होतं ते म्हटलंय...' असं जाहीर करत गुरमेहरनं निराशा व्यक्त केलीय. 

'मी खूप काही सहन केलंय. विसाव्या वयात मी याहून अधिक सहन करू शकत नाही. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होतं... माझ्यासाठी नाही. जे लोक माझ्या शौर्य आणि धैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत... त्यांच्यासमोर मी स्वत:ला गरजेपेक्षा जास्त सिद्ध केलंय' असंही गुरमेहरनं म्हटलंय.

गुरमेहर कौर
सौ. फेसबुक

विरुच्या ट्विटमुळे दु:खी

एका टीव्ही कार्यक्रमात गुरमेहनं 'ज्याला मी लहानपणापासून खेळताना पाहत आलेय त्या विरेंद्र सेहवागच्या ट्विटमुळे मला अतोनात दु:ख झालंय'...

एका पोस्टमध्ये गुरमेहरनं '1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या वडिलांना पाकिस्ताननं नाही तर युद्धानं ठार केल्याचं' म्हटलं होतं... या ट्विटची खिल्ली उडवत विरेंद्र सेहवागनं 'दोन तिहेरी शतक मी नाही तर माझ्या बॅटनं ठोकले होते' असं म्हटलं होतं.