सावधान! बॅंकांच्या व्याजदरात वाढ

रिझर्व्ह बॅंकेने रूपयाला सावरण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता खासगी बॅंकानी आपल्या मुळ कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बॅंकाने ०.२५ टक्के वाढ केल्याने गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्जाच्या व्याज दरातदेखील वाढ झाली आहे.

Updated: Aug 24, 2013, 05:07 PM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेनं रुपयाचं मूल्य सावरण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आता खासगी बँकानी आपल्या कर्जाच्या मूळ व्याजदरात वाढ केलीय. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बँकांनी व्याजदरात पाव टक्का वाढ केल्यानं गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्जांच्या व्याजदरातदेखील वाढ झालीय.
आयसीआयसीआय बँकेने आपल्या कर्जाच्या मूळ व्याजदरात ०.२५ टक्के वाढ केल्याने आता गृहकर्जाचा व्याजदर ९.७५ वरून १० टक्के झाले आहे. फ्लोटींग व्याजदरावर गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. मात्र, स्थिर व्याजदराने घेतलेल्या कर्जांवर याचा जास्त काही परिणाम होणार नाही.

खाजगी क्षेत्रातील आणखी एका बँकेने म्हणजे एचडीएफसी बँकेनेदेखील आपल्या कर्जाच्या व्याज दरात ०.२५ टक्के वाढ केली असल्याने ३० लाखापेक्षा कमी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता १०.४० टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे तर ३० लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना १०.६५ टक्के दराने व्याज चुकवावं लागेल. सध्या हे दर १०.१५ टक्के एवढे आहे.
बँकेने प्राइम लेंन्डिंग दरातही किरकोळ वाढ केलीय. बँकेचे हे नवीन दर शुक्रवार, २३ ऑगस्टपासून लागू झाले आहेत, असे एचडीएफसी बँकेने स्पष्ट केलंय.
ठेवीदारांना मात्र दिलासा...
रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयामुळे खाजगी बँकांना रोख रक्कमेची गरज भासू लागली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. या बॅंकेने ४६ ते ६० दिवसांच्या एफडीवर ०.७५ टक्के व्याज वाढ करून ७ टक्के केली आहे, तर ६१ ते २८९ दिवसांच्या एफडीवरील व्याज ७.७५ टक्के केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.