बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव

व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

Updated: Feb 10, 2017, 11:25 AM IST
बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव title=

नवी दिल्ली : फेसबुक या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

तेज बहादूर यादव यांच्या पत्नीने याबाबत दिल्ली हायकोर्टात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केलीय. तेज बहादूर यादव नेमके कुठे आहेत याबद्दलची कोणतिही माहिती देण्यात येत नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय.

एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांमध्ये त्याला न्यायालयासमोर हजर करणं बंधनकारक असतं. न्यायालयाकडून त्याला कोठडी सुनावली जाते. मात्र, तेज बहादूर यांना न्यायालयासमोर हजर न करता अनेक दिवसांपासून ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय... यासोबतच सीमा सुरक्षा दलाकडून तेज बहादूर यादव यांची माहितीही दिली जात नसल्यानं त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडलीय.

 

तेज बहादूर यादव यांचं त्यांच्या पत्नीशी 7 फेब्रुवारी रोजी शेवटचं बोलणं झालं होतं... परंतु, त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. मोबाईलवर कॉल केला तरी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता तेज बहादूर सध्या कुठे आहेत याची कुणीही माहिती दिली नसल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलंय.