'गार्डन मैं कितना फ्लावर है'

नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त होतेय. अर्थात हे हिमनगाचं एक टोक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नोटांचे दलाल काळा पैसा गुलाबी करून देण्याच्या खटपटीत आहे. आयकर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवलीय.

Updated: Dec 16, 2016, 11:57 AM IST
'गार्डन मैं कितना फ्लावर है'  title=

अजित मांढरे, मुंबई : नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त होतेय. अर्थात हे हिमनगाचं एक टोक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नोटांचे दलाल काळा पैसा गुलाबी करून देण्याच्या खटपटीत आहे. आयकर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवलीय.

नोटा बदलून देणाऱ्या दलालांचं रॅकेट... 

ITच्या डोळ्यात धूळ फेकण्याची शक्कल... 

दलालांच्या कोड लँग्वेजमुळे यंत्रणांची धावपळ...

'गार्डन में कितने फ्लावर है..?' ब्लॅक मार्केटमध्ये हे वाक्य चांगलंच प्रचलित झालंय... या वाक्यानं आयकर विभागातल्या अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. हे नेमकं काय आहे, याचा शोध घेता घेता हाती आली काळ्याच्या पांढरा करणाऱ्या दलालांची कोड लँग्वेज... ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर काळा पैसा कुणाच्याही नजरेत न येता बदलण्याचं मोठं आव्हान अनेकांसमोर आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले दलाल ही खास भाषा वापरत आहेत. 

८ नोव्हेंबरचा नोटाबंदीचा निर्णय आणि २ डिसेंबरपासून ५००-१००० च्या नोटा चलनातून पूर्णता: बंद झाल्याने आता नोटा बदलून देणाऱ्या दलालांचा भाव वधरलाय. सुरुवातीला ५ ते १० टक्क्यांनी पैसे बदलून देणारे दलाल आता थेट २५ ते ३५ टक्के दलाली घेवून जुन्या नोटा बदलून देतायत. पण यातही पकडले जाण्याची भीती असल्याने कोडवर्डचा वापर करुन हे दलाल यंत्रणांची दिशाभूल करताना दिसतायत. 

काही दिवसांपूर्वी आयकर विभागाला खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की 'गार्डन मे कितने फ्लॉवर है' या वाक्याचा उपयोग होतोय. याचा संबंध त्या खबऱ्याला माहीत नव्हता पण याचा संबंध नोटबंदीशी असावा, अशी कुणकुण होती. माहिती काढल्यानंतर हा कोडवर्डच आहे आणि त्याचा संबंध ५००-१००० च्या जुन्या नोटा बदलून देण्याशी असल्याचं लक्षात आलं. नंतर यंत्रणांनी ही भाषा डिकोड केली.

'गार्डन मैं कितना फ्लावर है'

- गार्डन म्हणजे ज्या व्यक्तीकडेब जुन्या नोटा आहेत ती व्यक्ती आणि फ्लावर म्हणजे रुपये... या कोड भाषेनुसार गार्डन मैं कितने फ्लावर है याचा अर्थ  'ज्या व्यक्तीकडे जुन्या नोटा आहेत त्याच्याकडे किती जुन्या नोटा आहेत'

- ५०० जुन्या नोटांना दलाल 'यलो फ्लॉवर' म्हणतात 

- नव्या ५०० नोटांसाठी 'ग्रीन व्हेजिटेबल्स' हा शब्द वापरला जातोय

- १०००च्या नोटेला 'रेड रोझ' 

- आणि २००० च्या नव्या कोऱ्या नोटेला 'पिंक पेपर' म्हटलं जातंय

- 'गार्डनर' म्हणजे ज्यांचाकडे जुन्या नोट आहेत ती व्यक्ती

- तर जो नव्या नोटा उपलब्ध करून देणारे त्याला 'प्रिस्ट' म्हणजे पुजारी संबोधलं जातंय

मोबाईलवरून व्यवहार करताना या कोडवर्डचा वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये २५ ते ३५ टक्के 'दक्षिणा' घेऊन नव्या नोटांचा 'प्रसाद' देणारे 'प्रिस्ट' हे बॅंक, विमानतळ, रेल्वे, वीज देयक केंद्र आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी असल्याचीच शक्यता आहे.  

खरं तर आता नोटा बदलांची दलाली ५० टक्क्यांवर येवून पोहोचलीये. आणि सोने देखील आता खरेदी करता येत नसल्याने काळा पैसा पांढरा करणाऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात ५० टक्के चढ्या दराने परेदशी चलन घेवून घ्यायला सुरुवात केलीये.