इंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2012, 12:55 PM IST

www.24taas.com, मुंबई
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.
राज्यसभेतमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाची राज्यसभेत घोषणा केलीय तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी लोकसभेत ही घोषणा केलीय. महापरिनिर्वाण दिनापूर्वीच डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणाची घोषणा झाल्यामुळे संसदेच्या बाहेर आणि इंदू मिल परिसरात एकच जल्लोष दिसून येतोय.
दरम्यान, हा केवळ एका पक्षासाठी किंवा एका समाजासाठी आनंदाचा निर्णय नसून साऱ्या देशासाठीच हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी झी २४ ताससाठी बोलताना व्यक्त केलीय.
ही जमीन सर्वप्रथन खाजगी मालकीची होती. त्यानंतर १९७४ साली ही जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आली. या जमिनीचा वापर उद्योगासाठीच होईल, अशी अट होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी राज्य स्तरावर अनेक नियम शिथिल केले. त्यानंतर केंद्र सरकार स्तरावरचे तांत्रिक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. ही जागा हस्तांतरीत झाल्यानंतर प्राधिकरण स्थापन करुन या जागी डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या दलित नेत्यांच्या लढ्याला यामुळं यश आलंय.