वेश्यावस्तीत झाली बाप-लेकीची भेट

पश्चिम बंगालमधून तीन महिन्यांपूर्वी हरवलेली एक मुलगी तिच्या वडिलांना नवी दिल्लीमधल्या वेश्यावस्तीत आढळून आली. ही मुलगी पश्चिम बंगालमधील २४ परगणा या भागात राहाणारी होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 12, 2013, 04:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधून तीन महिन्यांपूर्वी हरवलेली एक मुलगी तिच्या वडिलांना नवी दिल्लीमधल्या वेश्यावस्तीत आढळून आली. ही मुलगी पश्चिम बंगालमधील २४ परगणा या भागात राहाणारी होती.
इयत्ता दहावीत शिकणारी ही मुलगी नर्स बनू इच्छित होती. मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तयारी ती करत होती. संध्याकाळी थोड्यावेळासाठी फिरायला बाहेर पडली असता तिचं अचानक कुणीतरी अपहरण केलं. मुलगी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिचा थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांकडे तक्रार केली तरी त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मुलगी केवळ मिसिंग असल्याचंच तक्रारीत लिहिण्यात आलं. यानंतर वडिलांनी एका एनजीओची मदत घेऊन आपल्या मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
अखेर एक दिवस त्यांना दिल्लीमधून फोन आला. या फोनवरून एका अनोळखी व्यक्तीने सांगितलं की तुमची मुलगी दिल्लीमधील जी बी रोडवरील वेश्यावस्तीत आहे. तिथून तिला बाहेर पडायचं आहे. हे ऐकून वडील आणि शक्तिवाहिनी एनजीओचे कार्यकर्ते दिल्लीमध्ये पोहोचले. तेथे वडिलांना आपली मुलगी आढळून आली. तेथून तिची सोडवणूक करण्यात आली. सध्या ही मुलगी नारी निकेतनमध्ये आहे. लवकरच ती पुन्हा घरी परतणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.