आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 3, 2013, 08:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.
शिवाय मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या धर्तीवर ग्राहकांना घरगुती गॅसची एजंसी बदलण्याची मुभा मिळणार आहे. ही योजना देशातील ३० शहरांमध्येच सध्या राबवण्यात येणार असून त्यात मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे.
पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत अनुदानित सिलेंडरपेक्षा दुप्पट असेल. त्यावर कोणतंही सरकारी अनुदान देता येणार नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांचे देशभरात १४४० पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी निवडक काही पंपावर हे सिलेंडर मिळू शकेल.
मुंबईत पाच किलो अनुदानित सिलिंडरची किंमत १६३ रुपये आहे. पेट्रोल पंपावर हाच सिलिंडर ३९६ रुपयांना मिळेल. या सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांचं मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट, विद्यार्थी ओळखपत्र आदींची छायांकित प्रत ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.