याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. 

Updated: Aug 7, 2015, 12:26 PM IST
याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...  title=

मुंबई : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि याकूब मेमनचा भाऊ टायगर मेमन याच्याबद्दल आता एक नवीन खुलासा झालाय. याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. यावेळी, 'याकूबच्या फाशीचा बदला घेणार' असंही त्यानं म्हटलंय. 

'इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या बातमीनुसार, याकूब मेमनला फासावर चढवण्यापूर्वी टायगरनं मुंबई स्थित आपल्या घरी फोन केला होता. टायगर मेमननं त्यादिवशी सकाळी ५.३० वाजता फोन केला आणि आईशी जवळपास ३ मिनिटं बोलला. यावेळी, त्यानं कुटुंबीयांना सांत्वना दिली नाही पण, बदला घेणार असल्याची वाचाळ बडबड मात्र केली. 'याकूबच्या फाशीचा बदला घेण्यात येईल. कुटुंबीयांचा एकही अश्रू वाया जाणार नाही' असंही त्यानं म्हटलंय. 

रिपोर्टनुसार, मास्टरमाईंड टायगरचा हा आवाज मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केलाय. मुंबई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, मुंबई स्थित अल हुसैनी टायगरच्या फोनची बेल वाजली तेव्हा एका दुसऱ्या व्यक्तीनं त्याचा हा फोन घेतला. टायगरनं सलाम वालेकुम म्हणत फोन आईला देण्यास सांगितलं. यावेळी, त्यानं अनेकदा याकूबच्या फाशीचा बदला घेणार असल्याचं म्हटलं. 

यावर, त्याच्या आईनं  रडत - रडत त्याला थांबवत 'अगोदर झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे माझा याकूब गेला आता आणखी नाही पाहू शकत' असं म्हटलं. 

पण, टायगरनं मात्र आईचं ऐकण्याचं नाव घेत नव्हता.... आणि पुन्हा पुन्हा सूड उगवण्याची भाषा करत राहिला. यानंतर हनिफानं फोन दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात दिला. त्यालाही टायगरनं तेच बोलून दाखवलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.