`अॅपल` सोडून लाल बहादूर शास्त्रींचा नातू `आप`मध्ये!

लाल बहादूर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी शुक्रवारी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आदर्श शास्त्री यांनी ‘अॅपल’ या कंपनीतील भरघोस पगाराच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2013, 02:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आदर्श राजनीतीचं उदाहरण देताना दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरील बऱ्याचदा देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा उल्लेख करतात. याच लाल बहादूर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी शुक्रवारी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आदर्श शास्त्री यांनी ‘अॅपल’ या कंपनीतील भरघोस पगाराच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
जगातील सर्वात मोठी मोबाईल निर्माता कंपनी म्हणून ‘अॅपल’ ही ओळखली जाते. याच कंपनीत आदर्श शास्त्री यांना वार्षिक एक करोड रुपयांपेक्षा जास्त पगार होता. ४० वर्षीय आदर्श अॅपल कंपनीचे पश्चिम भारताचे सेल्स हेड होते. ते मुंबईत काम करत होते. तसंच आदर्श यांचे वडिल अनिल शास्त्री काँग्रेसचे सदस्य आहेत. आलिशान कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये आपलं तारूण्य घालवलेल्या आदर्श शास्त्रींनी आता या सर्व वैभवावर पाणी सोडून आता हाती घेतलाय तो आम आदमी पार्टीचा झाडू... आता त्यांना कोणतंही निश्चित उत्पन्न किंवा पगार मिळणार नाही. त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतलाय.
वडिल काँग्रेस नेते आणि आजोबा देशाचे पंतप्रधान राहिले असले तरी त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याचा निर्णय पूर्णपणे व्यक्तीगत असल्याचं स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन, सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं ते आवर्जून सांगतात.
आम आदमी पार्टीसाठी काम करण्याचा निर्णय आधी काँग्रेस नेते असलेल्या वडिलांना सांगितला, आपण काँग्रेस संस्कृतीमध्ये रमणार नसल्याचं सांगून त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये जाण्यासाठी वडिलांचे आशीर्वाद असल्याचंही आदर्श शास्त्री सांगतात. आम आदमी पार्टीमध्ये जाऊन समाजकार्य करण्याचा निर्णय हा काही एक-दोन दिवसातला नसून गेल्या दोन तीन महिन्यांपासून ते याबाबत विचार करत होते, असंही त्यांनी सांगितलं. वडिलांना गेल्याच आठवड्यात आपला निर्णय पक्का झाल्यावर त्याची कल्पना दिली आणि त्यांनीही माझ्या निर्णयाला आडकाठी केली नाही, असं आदर्श शास्त्री आवर्जून सांगतात.
काँग्रेस नेते अनिल शास्त्री यांना याबाबत विचारल्यावर त्यांनीही आदर्श `आम आदमी पार्टी`मध्ये जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचं आयुष्य हे त्याचं आहे, त्याने त्याचा निर्णय घ्यायचा आहे, असंही अनिल शास्त्री म्हणाले. अनिल शास्त्री यांना तीन मुले आहेत. मात्र कोणालाही सक्रिय राजकारणात रूची नव्हती. मात्र आम आदमी पार्टीच्या कार्यपद्धतीने त्याचं मतपरिवर्तन केलं असावं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आदर्शला खरोखरच राजकारणात यायचं असेल त्याने काँग्रेसमध्ये आलं पाहिजे या मताचा मी आहे, मात्र माझं मत मी त्याच्यावर लादणार नाही. तो त्याचं आयुष्य जगण्यासाठी स्वतंत्र आहे, असंही अनिल शास्त्री यांनी स्पष्ट केलं.
तब्बल पंधरा वर्षे टेलिकॉम क्षेत्रात काम केलेल्या आणि कोट्यवधी रूपये पगाराची अॅपलची नोकरी सोडल्यानंतर चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागणार? या प्रश्नाला ते लवकरच एक टेलिकॉम सेवा देणारी कंपनी सुरू करणार असल्याचं सांगतात. या कंपनीच्या माध्यमातून ते `आम आदमी पार्टी`लाही वेळ देऊ शकतील तसंच आपल्या दोन लहान जुळ्या मुलांसह चौघांच्या कुटुंबाचा खर्चही भागवू शकतील, असं आदर्श शास्त्री सांगतात.
`आम आदमी पार्टी`ने अजून आदर्श शास्त्री कोणतीही निश्चित अशी जबाबदारी दिलेली नाही. मात्र आम आदमीसाठी कोणतंही आणि देशात कुठेही काम करायची त्यांची तयारी आहे. आम आदमी पार्टीने सांगितलं तर लोकसभा निवडणूक लढायलाही तयार असल्याचं आदर्श शास्त्री आवर्जून सांगतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.