‘राम’ अत्यंत वाईट पती : जेठमलानी

‘राम हा अत्यंत वाईट पती होता’ असे उद्गार काढलेत भारतीय जनता पक्षाचे खासदार राम जेठमलानी यांनी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 9, 2012, 02:50 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘राम हा अत्यंत वाईट पती होता’ असे उद्गार काढलेत भारतीय जनता पक्षाचे खासदार राम जेठमलानी यांनी...
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विवेकानंद आणि दाऊद यांच्या ‘आयक्यू’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता राम जेठमलानी यांनी थेट रामाबद्दलच गैरउद्गार काढल्यानं भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘राम हा अत्यंत वाईट पती होता. कोणत्याही कारणाशिवाय केवळ एका धोब्याच्या सांगण्यावरून त्याने सीतेला वनवासात पाठवलं’ असं जेठमलानी यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यांना लक्ष्मणालाही सोडलं नाही. ‘लक्ष्मण तर रामाहूनही वाईट होता. सीतेचं अपहरण झाल्यानंतर रामाने तिला शोधण्याचा आदेश दिल्यानंतर मी सीतेचे केवळ चरण पाहिले आहेत, चेहरा नव्हे. त्यामुळे मी तिला ओळखू शकणार नाही, अशी सबब त्याने सांगितली’ असंही जेठमलानी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात स्त्री-पुरूष संबंधांवर बोलताना जेठमलानी यांनी प्रभू रामावरही टीकास्त्र सोडलं. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामानं गरीब सीतेला वनवासात पाठवलं असं जेठमलानी म्हणाले.
एकीकडे राममंदिराच्या मुद्दयावर भाजप वर्षानुवर्षे राजकारण करत असताना दुसरीकडे भाजपचेच नेते राम जेठमलानी यांनी अशा प्रकारे रामाबद्दल गैरउद्गार काढल्यानं भाजप नेत्यांना झालंय तरी काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. विरोधकांनी जेठमलानी यांच्यावर जोरदार टीका केलीय. मात्र, जेठमलानी यांनी आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असून कुणाचीही मागणी मागणार नसल्याचं म्हटलंय.