ममतांच्या पुतण्याच्या कानाखाली आवाज काढला

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या श्रीमुखात एका व्यक्तीने भडकावली आहे.  

Updated: Jan 5, 2015, 09:14 AM IST
ममतांच्या पुतण्याच्या कानाखाली आवाज काढला title=

तामलुक : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या श्रीमुखात एका व्यक्तीने भडकावली आहे.  

चंडीपूर येथे पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील  एका सभेत रविवारी ही घटना घडली.  अभिषेक यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या पक्ष कार्यकर्त्याचे नाव अद्याप समजलेले नाही. 

तृणमूल युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले अभिषेक यांची  चंडीपूरमध्ये रविवारी सभा होती. या सभेत ते भाषण करीत असताना एक कार्यकर्ता व्यासपीठावर गेला आणि त्याने त्यांच्या कानफटात लगावली. 

यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर ही सभा रद्द करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.