मान्सून अंदमानात दाखल, 6 दिवस आधीच मान्सूनचे आगमन

राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना अंदमानात मान्सूनची चाहूल लागलीय. दक्षिण अंदमान किनारा, आणि निकोबार बेट या भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलीय.  

Updated: May 14, 2017, 06:12 PM IST
मान्सून अंदमानात दाखल, 6 दिवस आधीच मान्सूनचे आगमन title=

नवी दिल्ली : राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना अंदमानात मान्सूनची चाहूल लागलीय. दक्षिण अंदमान किनारा, आणि निकोबार बेट या भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलीय.  

हवामानाच्या डायनॅमिक प्रकाराच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरिक्षणं आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्यावर्षी 18 मेला मान्सून अंदमानात दाखल झाला होता. यावर्षी सहा दिवस आधीच मान्सूनच आगमन झालंय. 

पुढील 72 तासात मान्सून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरला पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. 

यंदा मान्सून 96 टक्के होणार असा अंदाज हवामान खात्याने गेल्या महिन्यात वर्तवला होता. मात्र, अलनिनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि अनुकूल परिस्थिती यामुळे देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान खात्याने स्पष्ट केलंय.