`...त्यात काय झालं, महालांमध्येही लोक मरतात`

‘सैफई महोत्सवा’त बॉलिवूड कलाकारांच्या हजेरीमुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या सरकारच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 12, 2014, 07:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘सैफई महोत्सवा’त बॉलिवूड कलाकारांच्या हजेरीमुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या सरकारच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. कारण, याच सरकारच्या आणखी एका मंत्र्यांना आपल्या वक्तव्यानं पुन्हा जनतेचा रोष ओढावून घेतलाय.
अखिलेश सरकारमध्ये क्रीडा मंत्री नारद राय यांनी, ‘लोक तर महालांमध्येही मरतात, तर मग सरकारच्या शिबिरांमध्ये लोक मेले तर एवढा गोंधळ माजवायची काय गरज आहे?’ असं म्हणत एकच खळबळ उडवून दिली.
`लहान मुलांचा मृत्यू, म्हाताऱ्यांचा मृत्यू किंवा तरुणांचा मृत्यू तर शाश्वत आहे... जो कॅम्पमध्ये राहतो त्याचाच मृत्यू होणं काही गरजेचं नाही... महालांमध्ये राहणारेही मरतात` अशी पृष्ठीही नारद राय यांनी जोडली. ‘असं नाही की तुमच्या आणि आमच्या घरांतील लहान मुलांचा मृत्यू होत नाही आणि रस्त्यावर – फुटपाथवर झोपणारे यापासून वाचतात’ असंही त्यांनी म्हटलंय.
मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर बनवल्या गेलेल्या आश्रित छावण्यांमध्ये थंडीमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. यामुळे अखिलेश सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं. यावर अखिलेश सरकारनं मीडिया आपली इमेज खराब करत असल्याचा आरोप केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.