दुर्गाला नोएडात पोस्टिंग देणं चूक – अखिलेश

“दुर्गा नागपालला ग्रेटर नोएडामध्ये पोस्टिंग देऊन आपण चूक केली”, असं अमेरीकेतल्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव यांनी म्हटलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 8, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाबाबतच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. याचसंदर्भात अखिलेश यादवनं पुन्हा स्पष्टीकरण दिलंय. “दुर्गा नागपालला ग्रेटर नोएडामध्ये पोस्टिंग देऊन आपण चूक केली”, असं अमेरीकेतल्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव यांनी म्हटलंय.

दुर्गा नागपाल या पहिले पंजाबमध्ये कार्यरत होत्या. त्यांचं ग्रेटर नोएडामध्ये पोस्टिंग त्यांच्या पतीच्या आग्रहावरुन केलं होतं, असंही अखिलेश यादव यांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं. दुर्गा नागपाल यांचे पती अभिषेक सिंह हे सुद्धा आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या गाझियाबाद इथं कार्यरत आहेत.

अभिषेक सिंह यांना दुर्गा नागपालचं पोस्टिंग शेजारच्या जिल्ह्यात हवं होतं. जेणेकरून ते आपल्या कुटुंबियांसोबत राहू शकेल. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला, असं अखिलेश यादव यांना वाटतं. अखिलेश यांच्या या मुलाखतीवरुन दुर्गा नागपाल यांनाच ते दोषी मानतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.