ममता बॅनर्जींवर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

 सारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

Updated: Nov 14, 2014, 04:37 PM IST
ममता बॅनर्जींवर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न title=

कोलकाता :  सारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

जेलमध्येच त्यांनी झोपेच्या तब्बल ९८ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यानंतर घोष यांनी स्वतः ही माहिती जेल अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर घोष यांना कोलकात्याच्या एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान, कुणाल घोष यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, जेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या कशा पोहचल्या? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. कारण चारच दिवसांपूर्वी कुणाल घोष यांनी जेलमध्ये आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

१० नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत घोष यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अरविंद मिश्रा यांच्यासमोर 'चौकशीत हस्तक्षेप होतोय... मी केवळ तुरुंगात सडत राहू आणि यात सहभागी असलेले लोक उघडपणे फिरत राहतील, हे मला मान्य नाही. मी तीन दिवसांची वेळ देतोय, जर कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करेन' असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. पुढे, आपल्यावर असलेला दबाव स्पष्ट करत त्यांनी न्यायालयाला विनंती केली की 'या तीन दिवसांत माझे कोणतेही संबंधित किंवा माझ्या वकिलांना मला भेटण्याची परवानगी देऊ नये, अन्यथा मी प्रभावित होण्याची शक्यता आहे' 

कोण आहे कुणाल घोष ते पाहूया... 

कुणाल घोष गेल्या एक वर्षापासून जेलमध्ये आहेत. ते सारदा ग्रुपचे मीडिया ऑपरेशन्सचे प्रमुख होते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सारदा चिटफंड घोटाळ्यात सामील असल्याचा त्यांनी आरोप केला होता... त्यामुळे, ते जास्तच चर्चेत आले. या घोटाळ्यातून ममतांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा मिळाल्याचा दावा, घोष यांनी केला होता. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.