दहशतवादी हल्ल्याची धमकी : काय म्हटलंय 'त्या' पत्रात...

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांना हायअलर्ट जारी करण्यात आलेत.  

Updated: Oct 24, 2014, 04:23 PM IST
दहशतवादी हल्ल्याची धमकी : काय म्हटलंय 'त्या' पत्रात... title=

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांना हायअलर्ट जारी करण्यात आलेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका निनावी पत्राद्वारे हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचं म्हटलं गेलंय. मुंबई आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या दोन विमानांना धोका असल्याचं या पत्रात म्हटलं गेलंय.  

हे पत्र केवळ दिशाभूल करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सूरक्षा यंत्रणांना वाटतंय... पण, ते कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळेच देशभरातील सगळ्या विमानतळांना हायअलर्ट दिला गेलाय. 

विविध विमानतळांवर बॉम्ब डिस्पोजल स्कॉड तैनात करण्यात आलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांच्या नावावर हे निनावी पत्र धाडण्यात आलंय. 

शुक्रवारी रात्री अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि शनिवारी पहाटे मुंबईहून कोच्चीला जाणाऱ्या विमानांना टार्गेट करण्यात येईल, असं या पत्रांत म्हटलं गेलंय. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यासाठी सुसाईड बॉम्बर्सचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.

'द ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरीटी'नं विमानतळांना एक पत्र पाठवून या धोक्याची सूचना दिलीय. यामध्ये, 'सूत्रांच्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा अहमदाबादहून मुंबई आणि 25 तारखेला पहाटे 5 वाजता मुंबईहून कोचीसाठी उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये सुसाईड बॉम्बर्स असण्याची शक्यता आहे... याबाबत दक्षता घ्यावी... तसंच मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांवरही यादिवशी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी' असं म्हटलं गेलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.