कनिमोळींची तिहारमधून जामीनावर सुटका

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला आहे.

Updated: Nov 28, 2011, 11:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला आहे.

तब्बल सहा महिन्यानंतर पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कनिमोळी यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यांना देशाबाहेर न जाण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे. या प्रकरणी करीम मोरानी, आसिफ बलवा, शरद कुमार, राजीव अग्रवाल यांचीही सुटका करण्यात आली आहे.

यावर्षी मे महिन्यात कनिमोळी यांना २०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिने कनिमोळी यांना तिहार जेलची हवा खावी लागली होती.

याबाबत शुक्रवारी दिल्ली हायकोर्टापुढे आलेल्या याचिकेवर कोर्टाने सुनावणीसाठी आज सुनावणी झाली. या खटल्यात आतापर्यंत पाच आरोपींना जामिन मिळाल्यानंतर कनिमोळी यांच्यासह या घोटाळ्यात अडकलेल्या अन्य साथीदारांना सुटकेची आशा वाटू लागली होती. त्यानुसार आज आणखी पाच जणांची सुटका करण्यात आली आहे.

सुटका झालेल्यांमध्ये फिल्म प्रोड्यूसर करीम मोरानी, कलैंगर टीव्हीचे एमडी शरद कुमार, कुसेगांव फ्रूट ऐंड वेजिटेबिल्स प्रा. लिमिटेड चे संचालक आसिफ बलवा आणि  शरद कुमार यांचा समावेश आहे.