सोनेरी स्वप्न: खोदकामात मिळाल्या किंमती वस्तू

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, October 22, 2013 - 15:11

www.24taas.com, वृत्तसंस्था, उन्नाव
उन्नावच्या डौडिया खेडा इथं सुरू असलेल्या खोदकामात अनेक ऐतिहासिक आणि किमती वस्तू पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. १००० टन सोन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्व विभागाला भिंतीनंतर आता लाखेच्या बांगड्यांचे पाच तुकडे आणि मातीचे भांडे मिळाले आहेत.
चौथ्या दिवशी किल्ल्याच्या परिसरात ४८ सेंटीमीटर खोदकाम केलं गेलं. चार दिवसांमध्ये आतापर्यंत १.५ मीटर खोदकाम झालंय. एएसआयच्या टीमला दोन दिवसांपूर्वी जवळपास १ मीटर रुंदीची भिंत सापडली. त्याआधारेच आता पुढचं खोदकाम सुरू आहे.
तर काल दुपारी डौडिया खेडा इथं पोहोचलेले संत शोभन सरकारचे शिष्य ओम यांनी मीडियाला पुन्हा सांगितलं की किल्ल्यातल्या खोदकामात १००० टन सोनं सापडेलच. त्यांनी पुरातत्व विभागाचा (जीएसआय) रिपोर्टही पत्रकारांना दाखवला.
बिघापूरचे एसडीएम विजय शंकर दुबेनं सोमवारी संध्याकाळी खोदकाम संपल्यानंतर सांगितलं की, आज चौथ्या दिवशी ४८ सेंटीमीटर खोदकाम झालं. खोदकामादरम्यान मातीची मोठी भट्टी मिळाली. या भट्टीवर खूप लोकांसाठी जेवण बनवलं जात असल्याचा अंदाज आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सध्या जिथं खोदकाम सुरू आहे. तिथं किचन आणि स्टोअर रूम असण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं सोनं इथं लपवलं गेलं असल्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013 - 15:03
comments powered by Disqus