आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

Updated: Nov 18, 2015, 04:41 PM IST
आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं! title=

पॅरिस/मॉस्को: पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

आयसिस या दहशतवादी संघटनेच्या खात्म्यासाठी रशिया आणि फ्रान्सनं एकत्रित कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही देशांनी मंगळवारी आयसिसच्या सीरिया आणि इराकमधल्या तळांवर जोरदार बॉम्ब वर्षाव केला. रशियानं गेल्या दोन महिन्यांपासून आयसिस विरोधात हल्ले सुरू केलेत.

आणखी वाचा - जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन 

त्यानंतर इजिप्तमध्ये एक रशियन नागरी विमान आयसिसच्या दहशतवाद्यांनी पाडलं. त्यात दोनशे प्रवासी मृत्यूमुखी पडले. त्यापाठोपाठ फ्रान्सची राजधानी पॅऱिसमध्ये आयसिसनं हल्ला केला. त्यात १३० हून अधिक जण ठार झाले. त्यामुळे दोन्ही देशांनी इसिसचं अस्तित्व संपवण्याचा विडा उचललाय... त्याअंतर्गतच यापुढे हल्ले करताना दोन्ही देशांच्या वायू सेना समन्वय ठेवतील असा करार करण्यात आलाय. 

रशियानं काय केलं?

सीरियात रशियानं टीयू-१६० ब्लॅकजॅक आणि टीयू-९५ बियर हे बॉम्बफेकी विमान तैनात केलेत. आयसिसच्या ठिकाणांवर या विमानांमध्ये हल्ले सुरु आहेत. रशियानं पहिल्यांदाच आपल्या कमांड सेंटरचा व्हिडीओ जारी केलाय. या सगळ्या हल्ल्यांवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची करडी नजर आहे. रशियाचं विमान बॉम्बनं उडवणारे आयसिसचे दहशतवादी कुठेही लपले असतील तर त्यांना शोधून कठोर शिक्षा देणार असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय.. 

विमानावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी रशियानं पाच कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ३३० कोटी रुपये बक्षिस जाही केलयं. ३१ ऑक्टोबरला रशियाचं प्रवासी विमान दहशतवाद्यांनी इजिप्तच्या सिनाई भागात बॉम्बच्या साहाय्यानं उडवलं होतं. इजिप्तवरुन रशियांच्या सेंट पीटर्सबर्ग इथं येणाऱ्या या विमानातील सर्व २२४ प्रवासी ठार झालेत. विमानाच्या अवशेषांमध्ये बॉम्ब आणि दारुगोळ्याचे अंश सापडलेत.

पॅरिसचा हल्लाबोल

पॅरिसमध्ये हाहाकार माजवणाऱ्या आयसिसविरोधात फ्रान्सनंही दंड थोपटलेत. निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या आयसिसला धडा शिकवण्यास फ्रान्सनं सुरुवात केलीय. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा फ्रान्सनं आयसिसच्या ठिकाणांना टार्गेट केलंय. फ्रान्सचे १२ फायटर जेट्स सातत्यानं सीरियात आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करतायत. फ्रान्सला यांत अमेरिकेचीही मदत मिळतेय. अमेरिकेच्या जॉर्डन आणि युएई एअरबेसचा यासाठी उपयोग होतोय. फ्रान्सच्या या हल्ल्यात आयसिसचे कमांड पोस्ट. ट्रेनिंग कॅम्प, भरती केंद्र आणि हत्यार डेपो उद्धवस्त झालंय.

भारतातही हाय अलर्ट

आयसिसचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. अमेरिका आणि युरोपला आयसिसकडून मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं देशात अलर्ट जारी केलाय. दिल्लीतले दूतावास आणि उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही देण्यात आलेत. राज्यांनाही सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आयसिस मदत करत असल्याचं गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे आयसिसचा धोका केवळ भारतालाच नसून तर साऱ्या जगाला आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

आणखी वाचा -  इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.