रशिया - भारत नवे करार पर्व, रशिया उभारणार १२ अणुभट्टय़ा

 भारताचा पारंपरिक मित्र रशियाने २० करारांवर सह्या केल्या आहेत. भारत रशियाच्या मदतीने १२ अणुभट्ट्या बांधणार आहे.

Updated: Dec 12, 2014, 04:25 PM IST
रशिया - भारत नवे करार पर्व, रशिया उभारणार १२ अणुभट्टय़ा  title=

नवी दिल्ली :  भारताचा पारंपरिक मित्र रशियाने २० करारांवर सह्या केल्या आहेत. भारत रशियाच्या मदतीने १२ अणुभट्ट्या बांधणार आहे.

संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात रशिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा सहकारी आहे. या क्षेत्रातील सहकार्यासाठी भारतासमोर अनेक पर्याय उभे राहू लागले असले तरीही रशियाचे असलेले बंध अतूट राहतील आणि भारताचा भक्कम सहकारी म्हणूनच आम्ही रशियाकडे पाहू, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते.

अध्यक्ष पुतिन यांच्याशी अनेक संरक्षण प्रकल्पांवर चर्चा केली.  'मेक इन् इंडिया' या भारतीय अभियानास रशियाने सकारात्मक प्रतिसाद देऊ केला आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. भारत आणि रशिया यांच्यातील सामरिक संबंधांना ऐतिहासिक संदर्भ आहेत. या भेटीमुळे हे संबंध नवी उंची गाठतील, असा विश्वास रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला. 

अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया या दोन्ही देशांत संरक्षण, नैसर्गिक वायू, तेल, गुंतवणूक आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील २० करारांवर सहमतीच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. येत्या २० वर्षांत रशिया भारतात १२ अणुभट्टय़ा बांधणार असून या सर्व अणुभट्टय़ांमध्ये सुरक्षेचे सर्वोच्च मानबिंदू काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. 

अद्ययावत अशा हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात करण्याची तयारीही रशियाने दाखवली आहे. आण्विक सहकार्याबरोबरच उभय देशांमध्ये आरोग्य, खनीकर्म, प्रसारमाध्यमे आणि पवनऊर्जा या क्षेत्रांमध्येही सहकार्य करार करण्यात आले.

करारात हे असणार 
> रशिया - भारत यांना जोडणाऱ्या हायड्रोकार्बन पाइपलाइनच्या शक्यतांचा संयुक्त अभ्यास गट स्थापणे
> नव्या तेलस्रोतांचे संशोधन, त्यांचे मूल्यांकन, उत्पादन आणि परिवहन आदींबाबत ऑईल इंडिया लिमिटेड आणि रशियाची झरुबेझनेफ्त यांच्यात सहकार्य करार
> 'कच्च्या तेलाच्या दीर्घकालीन पुरवठय़ाबाबत एस्सार आणि रशियाची रोसनेफ्त यांच्यात सहकार्य करार
> रशियाई संघराज्यात ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत टाटा पॉवर आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्य करार
भारतात लष्करी आणि नागरी कार्यासाठी उपयुक्त अशा रशियन बनावटीच्या अद्ययावत हेलिकॉप्टरची निर्मिती सुरू करण्यास सहमती
भारतीय सैन्याला रशियातील लष्करी प्रशिक्षण केंद्रांवर अद्ययावत प्रशिक्षण देणार.
लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण यांच्या प्रक्रियांबाबत तसेच द्विपक्षीय सैन्यातील सामंजस्य वाढीस लागावे म्हणून आवश्यक त्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या.
संरक्षण प्रणाल्यांचे आरेखन, रचना, निर्मिती आणि विकास यासाठी द्विपक्षीय सहकार्य.
संयुक्त संशोधन, संयुक्त उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण आदींमध्ये सहकार्य.
तीनही दलांच्या संयुक्त लष्करी कसरती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.