अनिल कपूरची रोमांचक प्रेमकहाणी

बॉलीवूडमधल्या अभिनेत्यांची खरीखुरी प्रेमकहाणी रुपेरी पडद्यासारखीच रोमॅटिंक असते

Updated: Feb 12, 2016, 04:25 PM IST
 अनिल कपूरची रोमांचक प्रेमकहाणी title=

मुंबई: बॉलीवूडमधल्या अभिनेत्यांची खरीखुरी प्रेमकहाणी रुपेरी पडद्यासारखीच रोमॅटिंक असते, पण अनिल कपूरची प्रेमकहाणी वेगळीच आणि रोमांचक आहे. 1980 च्या दशकात अनिल कपूरचा स्ट्रगलचा काळ सुरु होता, त्यावेळी तो रोज ऑडिशन देण्यासाठी जायचा. त्यावेळीच त्याला तिथे एक मुलगी दिसली, आणि पहिल्याच भेटीत ती अनिलच्या डोळ्यात भरली. 

या मुलीविषयी अनिलनं माहिती काढली तेव्हा ती एक यशस्वी मॉडेल असल्याचं त्याला समजलं. तसंच तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार हे पण त्याच्या लक्षात आलं.

आपल्या जवळच्या मित्रांना अनिलनं हे सगळं सांगितलं, आणि त्यातल्याच एकानं अनिलला तिचा नंबर दिला.  त्यानंतर अनिल कपूरनं जशा प्रकारे चित्रपटात हिरोईनला मनवतात तसेच फंडे वापरले, आणि तिच्याशी फोनवरून बोलायला सुरुवात केली.

तिनंच उचलला अनिल कपूरचा खर्च

अनिल कपूर तिच्याशी फोनवर तर बोलत होता, पण प्रत्यक्ष भेटायचं धाडस मात्र करत नव्हता, त्याचं कारण होतं पैसे, त्यावेळी अनिल कपूरकडे पैसे नसल्यानं तिला डेटला घेऊन जायला अनिल कपूर टाळत होता. 

त्यानंतर सुनिता बंबानीनंच अनिल कपूरला भेटायला बोलावलं, तेव्हा मी 2 तासांमध्ये पोहोचिन असं उत्तर दिलं. पण 2 तास का लागतिल असं सुनितानं विचारलं असता मी बसनं येईन कारण कॅबनं यायला माझ्याकडे पैसे नसल्याचं अनिलनं सुनिताला सांगितलं. 

अनिलचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सुनितानंही आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली, तु कॅब करुन ये, मी तुला पैसे देईन, असं सुनिता अनिलला म्हणाली. त्यानंतर अनेक वेळा सुनितानं अनिलला भेटण्यासाठी पैसेही दिले.

मित्रांनी दिला लग्न न करण्याचा सल्ला

हळू हळू अनिल कपूर बॉलीवूडमध्ये स्थिरावत होता, 1984 मध्ये आलेल्या मशाल या चित्रपटानं मग अनिल कपूरला ओळख मिळवून दिली.  या चित्रपटाच्या यशानंतर अनिलनं सुनिताला प्रपोज केलं, आणि सुनितानंही त्याला होकार दिला.

सुनिताच्या होकारानंतर बॉलीवूड चित्रपटांसारखचं ट्विस्ट या दोघांच्या आयुष्यात आलं. पहिल्याच चित्रपटानंतर अनिलनं लग्न केलं तर त्याची कारकिर्द गोत्यात येईल, असे सल्ले त्याला देण्यात आले, त्यामुळे लग्नाची ठरलेली तारिख त्यानं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे सुनिताही असुरक्षित होत होती. 

मग केव्हा झालं अनिल कपूरचं लग्न ?

यानंतर शांत डोक्यानं विचार केल्यानंतर अखेर 19 मे 1984 या दिवशी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सुनिता संसार सांभाळायला लागली, एवढच काय तर अनिल कपूरसाठी तिनं मॉडेलिंगही सोडलं आणि घर सांभाळलं. अनेक वेळा अनिल कपूरचं नाव माधुरी दीक्षितसोबतही जोडलं गेलं, पण सुनितानं याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं, आणि अनिल कपूरला प्रत्येक वेळी साथ दिली.