झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या - महाराष्ट्र दौ-याची’ दणक्यात सुरूवात

Updated: Dec 10, 2015, 10:25 PM IST
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या - महाराष्ट्र दौ-याची’ दणक्यात सुरूवात title=

मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. 

थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक तास निखळ मनोरंजन करणार याची जणू खात्रीच देते. गेल्या दिड वर्षांपासून झी मराठीवर अव्याहतपणे चालणारी विनोदाची ही हवा आता वादळाचं रूप घेणार असून हे वादळ महाराष्ट्राच्या गावागावात पसरणार आहे कारण प्रथमच ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आणि टीम निघाली आहे महाराष्ट्राच्या दौ-यावर. 

महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन तेथील प्रेक्षकांच्या समोर ‘चला हवा येऊ द्या’ चे काही विशेष भाग चित्रीत होणार असून याची अतिशय दणक्यात सुरूवात ९ डिसेंबरला पनवेल येथून झाली. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘कॅरी ऑन देशपांडे’ आणि ‘नागपूर अधिवेशन-एक सहल’ या मराठी चित्रपटांची टीम सहभागी झाली होती. 

धम्माल विनोदी स्किट्स, रंगतदार नृत्य आणि सोबतीला अनेक किस्से, आठवणी आणि मजेदार गप्पा असा मनोरंजनाचा भरपूर मसाला असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच १४ आणि १५ डिसेंबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून ‘चला हवा येऊ द्या - महाराष्ट्र दौ-याचे’ हे भाग बघायला मिळतील.  

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने पहिल्या भागापासूनच रसिक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली. आठवडयागणिक ती अधिकच मजबूत होत गेली आणि आता तर घराघरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा कार्यक्रम जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. प्रत्येक भागात काही तरी नविन आणि हास्याचा धमाका उडवून देण्याचं काम करणारी मंडळी म्हणजेच भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, विनित बोंडे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम आणि या सर्वांचा सुत्रधार म्हणजेच डॉ. निलेश साबळे या सर्वांच्या विनोदाची चौफेर फटकेबाजी या कार्यक्रमात बघायला मिळते. 


या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. यातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांची विनोदाची फटकेबाजी प्रत्यक्ष बघावी ही अनेकांची इच्छा असते परंतु प्रत्येकच प्रेक्षकाला त्यांच्यापर्यंत पोहचणं शक्य नसतं. त्यामुळेच मग या रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम निघाली आहे महाराष्ट्र दौ-यावर. एरवी स्टुडिओमध्ये मोजक्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा हा कार्यक्रम आता विविध शहरांतील आणि गावांतील प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष जाणार आहे. याची सुरूवात ९ डिसेंबरला नवी मुंबईतील पनवेलपासून झाली. यावेळी दोन भाग चित्रीत करण्यात आले.

नेपथ्यापासून ते सादरीकरणापर्यंत अनेकविध नव-नव्या गोष्टी या दोन भागांतून बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्र दौ-याची सुरूवात होणार आहे ‘नागपूर अधिवेशन – एक सहल’ या चित्रपटातील कलाकार म्हणजेच मकरंद अनासपूरे, चेतन दळवी, संकर्षण क-हाडे आणि मोहन जोशी यांच्या सोबतीने. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकात मोहन जोशी तर चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळा कुंभार ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळे या भागात जे विनोदी प्रहसन (स्किट) सादर करण्यात आलं ते यावरच आधारित होतं. 

या स्किटला पनवेलकर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे पहिल्यांदाच ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आले हे विशेष. मकरंद यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांतील अनेक आठवणी सांगितल्या शिवाय सध्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी त्यांनी नाना पाटेकरांसोबत सुरू केलेल्या उपक्रमाविषयीचे अनुभव सांगताना उपस्थितांना अंतर्मुखही केले. 

याशिवाय कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटातील पुष्कर श्रोत्री, विजय कदम, जयवंत वाडकर, संजय खापरे, मानसी नाईक आणि इतर अभिनेत्री तसेच दिग्दर्शक विजय पाटकर उपस्थित होते. या टीमसोबत थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या पत्रकारांसोबत रंगलेल्या थुकरट चर्चेने प्रेक्षकांना खळखळून हसविले. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून हे भाग प्रसारित होणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.