वय देत नाही साथ; कादर खान बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमात

एकेकाळी मोठ्या पडदा आपल्या तुफान कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती वयोमानामुळे त्यांची साथ देताना दिसत नाहीय.

Updated: Oct 15, 2015, 08:45 PM IST
वय देत नाही साथ; कादर खान बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमात title=
सौ. पतंजली मीडिया टीम

हरिद्वार : एकेकाळी मोठ्या पडदा आपल्या तुफान कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती वयोमानामुळे त्यांची साथ देताना दिसत नाहीय.

सध्या, कादर खान ८० वर्षांचे आहेत... ते चालूही शकत नाहीत किंवा धड बोलूही शकत नाहीत. पण, आयुष्य हसत जगण्याची त्यांची जिद्द मात्र कायम आहे.

सध्या कादर खान यांनी आयुर्वेदाचा आसरा घेतलाय... आणि यासाठीच ते बाबा रामदेवांच्या हरिद्वारमधल्या पतंजलि योगपीठात उपचारासाठी दाखल झालेत. मुंबईहून हरिद्वारपर्यंतच्या प्रवासात ते एकच प्रश्न वारंवार विचारत होते 'मी ठीक होईल ना?' अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिलीय.

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. इथं एका नर्सच्या चुकीमुळे ते स्ट्रेचरवरून खाली पडले. यामुळे, त्यांच्या आवाजावर परिणाम झालाय... शिवाय गुडघ्यांनाही चांगलाच मार बसलाय. यामुळे त्यांच्या समस्यांमध्ये अधिक वाढ झालीय. 


फाईल फोटो : कादर खान

कादर खान यांनी नुकताच हजचाही दौरा केलाय. त्यानंतर आयुर्वेदिक उपचारांसाठी त्यांनी पतंजलि योगपीठाचा आसरा घेतला. इथं त्यांना रुम नं ३०३ मध्ये ठेवण्यात आलंय. 

कादर खान यांनी अभिनेते, डायलॉग आणि स्क्रिप्ट रायटर आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलंय. १९७३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अभिनेता, व्हिलन, कॉमेडियन अशा विविध ढंगात आणि रुपांत प्रेक्षकांनी कादर खान यांना पाहिलंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.