जयंती वाघदरे/मुंबई : महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर स्टारर नटसम्राट या सिनेमाविषयी आपण बोलणार आहोत. कसा आहे नटसम्राट, हा सिनेमा तुमचे पैसे वसुल करणार का? आजवर अनेक नटसम्राट आपण पाहिले. या सिनेमाची ट्रु स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकुया..
नटसम्राटची गोष्ट
नटसम्राट ही गोष्ट आहे अप्पासाहेब बेलवलकरांची.. कुणी घर देता का घर असं म्हणत हतबल होउन... निराश होउन भटकणा-या, आपलं हरवलेलं अस्तित्व शोधणा-या एका मोठ्या आणि महान नटाची ही शोकांतिका नटसम्राट या सिनेमात मांडण्यात आली आहे. या आधीही रंगभूमीवर डॉ श्रीराम लागू, सतिश दुभाषी, चंद्राकांत गोखले, मधुसुदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक नटांनी नटसम्राट ही व्यक्तिरेखा अक्षरश: जगली.. हेच नाटक आता सिल्वर स्क्रिनवर सिनेमाच्या रुपात महेश मांजरेकर यांनी सादर करण्याचा प्रयत्न केलाय. आज २०१६च्या नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झालाय..
चित्रपटाची कथा
अप्पासाहेब बेलवलकर हे एक असं पात्र आहे जे केवळ एक दमदार नट नसून त्यांच्या रक्तातच अभिनय आहे.. त्यांना रंगभूमीची, ते सादर करत असलेल्या नाटकांची नशा आहे.. एक वेगळीच झिंग आहे.. एक ठराविक वय ओलांडल्यानंतर अप्पासाहेब बेलवलकर रिटायरमेंट घेतात.. आपल्या पत्नी आणि घरच्यांसोबत उरलेलं आयुष्य आनेदानं घालवायचं ठरवतात.. मुलीचं लग्न लावून देतात.. आपली संपूर्ण प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करतात.. या सगळ्या जबाबदा-यातून मुक्त होउन आपल्या पत्नीसह आनंदाना उरलेलं जीवन एकमेकांच्या सहवासात जगण्याचं स्वप्न ते पाहतात.. पण या सगळ्या त्यांच्या मनाप्रमाणे पार पडतात का.. रंगभूमीवर नटसम्राट म्हणुन वावरणारे अप्पासाहेब आपल्या घरातही ती जागा मिळवतात का? कायम प्रकाशझोतात राहणा-या या नटाचं जेव्हा रंगभूमीशी नातं तुटतं तेव्हा काय घडतं?.. या प्रश्नांची उत्तरं खरंतर तुम्हाला नटसम्राट हा सिनेमा पाहिल्यावरच कळेल.
सिनेमाचे दिग्दर्शन
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिगदर्शन करताना सिनेमाचा फर्स्ट हाफ थोडासा वेगळ्याच ट्रॅकवर नेउन ठेवलाय.. मद्यपान आणि अप्पासाहेब दोन गोष्टी खुप जास्त हाइलाइट झाल्या आहेत.. ज्यामुळे अप्पासाहेबांची एक हलकी ग्रे शेड दिसून येते.. जे खरंतर टाळता आलं असतं. इंटरवलनंतर खऱंतर सिनेमा ख-या अर्थानं मनाला स्पर्शून जातो.
तगडी स्टारकास्ट
नाना पाटेकर या नटानं साकारलेला नटसम्राट कमाल झालाय, त्यांची देहबोली, आवाजातील चढ उतार लाजवाब आहे. त्या व्यक्तिरेखेतल्या बारीससारीक गोष्टींचा अभ्यास करुन नानानं खुप सुंदर पद्धतीनं ही भुमिका रंगवली आहे. त्यांनी सादर केलेली स्वगतं कमाल झालीयेत. नानासोबतच अभिनेता विक्रम गोखले यांचा अभिनयही जबरदस्त झालाय.. त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा सुंदर झालीये. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या भुमिकेइतकीच महत्वाची व्यक्तिरेखा अभिनेत्री मेधा मांजरेकरनं साकारली आहे. त्यांचा अभिनयही कमाल झालाय. याच बरोबर सिनेमात नेहा पेंडसे, अजित परब, मृण्मई देशपांडे, सुनिल बर्वे अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळते.. या सगळ्यांनीच आपआपल्या भुमिका चोख पार पाडल्या आहेत. 'नटसम्राट' एक शोकांतिका असल्यामुळे सिनेमागृहातून बाहेर पडताना तुमचेही डोळे पाणावतील हे मात्र नक्की..
किती स्टार
'नटसम्राट' या सिनेमाला 3 स्टार्स..