व्हिडिओ : नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'चा ऑफिशल ट्रेलर

Updated: Dec 4, 2015, 01:44 PM IST

मुंबई : “कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’.

 विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र रंगभूमीवर साकारलं होतं ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी. 
 
 अप्पा बेलवलकरांची ही भूमिका करायला मिळावी हे त्याकाळातही आणि आजही प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्नच. डॉ. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर आणि राजा गोसावी यांच्याही वाट्याला ही भूमिका आली. आजही अभिनयाचं परिमाण म्हणून या भूमिकेकडे बघितलं जातं.

 प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक आता रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या माध्यमातून. आपला दमदार आवाज आणि अभिनयसंपन्नतेच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारत आहेत. 
 
 सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निर्मिती करणा-या झी स्टुडिओज् या संस्थेमार्फत ‘नटसम्राट’ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका शानदार सोहळ्यात सादर करण्यात आला.

‘नटसम्राट’ या नाटकाची ओळख ठरली ती याची संहिता आणि अभिनयसंपन्नता. अप्पासाहेब बेलवलकरांसोबतच त्यांची पत्नी कावेरीचं पात्रही यात तेवढंच दमदार आणि महत्त्वाचं होतं. रंगभूमीवर ज्युलियस सिझर, ऑथेल्लो, सुधाकर, हॅम्लेट अशी एकाहून एक सरस पात्र ज्याने लीलया साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्या नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा. 

अभिनयाची कारकिर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा.. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात. 

आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे नटसम्राट हे नाटक. याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येतेय अतिशय भव्य रूपात. यातील अप्पासाहेबांच्या भूमिकेकडे प्रत्येक अभिनेता शिवधनुष्य म्हणूनच बघतो आणि या भूमिकेचे कंगोरेही एवढे आहेत की ती प्रत्येकालाच साकारायला जमणं तसं अवघडंच. 

प्रसिद्धीच्या झोतात असताना चेह-यावर येणारा तो रूबाब आणि ती रया गेल्यानंतर चेह-यावर आलेली विषण्णता, जवळच्या लोकांनी दूर लोटल्यानंतर आयुष्यात आलेली हतबलता या सर्व गोष्टी समर्थपणे दाखवणं हे मोठं आव्हानचं. डॉ. लागू यांनी साकारलेली ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. हीच भूमिका आता चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे नाना पाटेकरांसारख्या तेवढ्याच ताकदीच्या अभिनेत्याच्या अभिनयातून.  

अप्पासाहेब बेलवलकरांइतकीच महत्त्वाची असलेली त्यांची पत्नी कावेरीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी. याशिवाय चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हेही एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनी विक्रम गोखले आणि नाना पाटेकर हे दोन दिग्गज अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. 

याव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, नेहा पेंडसे, अजित परब आणि जयवंत वाडकर या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे यांची असून संवाद किरण यज्ञोपवित आणि अभिजीत देशपांडे यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय परेश मांजरेकर यांनी तर कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांचे आहे तर छायाचित्रण केलंय अजित व्ही. रेड्डी यांनी. या चित्रपटात दोन गाणी असून ती अजित परब यांनी संगीतबद्ध केली आहेत.

फिनक्राफ्ट मीडिया, गजानन चित्र आणि ग्रेट मराठा यांची निर्मिती असलेला हा ‘नटसम्राट’ येत्या १ जानेवारीला झी स्टुडिओजच्या माध्यमातून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.