धक्कादायक वास्तव : का असं फसवलं जातंय मुलींना?

जिल्ह्यात वर्षभरात २७ कुमारी माता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  प्रेमप्रकरणातून झालेली फसवणूक तसेच वाट्याला आलेला लैंगिक अत्याचारामुळे या मुलींवर ही वेळ ओढवली आहे. एका जिल्ह्यातील हे वास्तव असेल, तर इतर जिल्ह्यांतही हे प्रमाण कमी अधिक असू शकते.

Updated: Nov 19, 2014, 06:10 PM IST
धक्कादायक वास्तव : का असं फसवलं जातंय मुलींना? title=

जळगाव : जिल्ह्यात वर्षभरात २७ कुमारी माता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  प्रेमप्रकरणातून झालेली फसवणूक तसेच लैंगिक अत्याचारामुळे या मुलींवर ही वेळ ओढवली आहे. एका जिल्ह्यातील हे वास्तव असेल, तर इतर जिल्ह्यांतही हे प्रमाण कमी अधिक असू शकते.

याबाबतीत आता युवतींची फसवणूक होऊ नये, पालक आणि युवतींमध्ये जागृकता निर्माण व्हावी, हे प्रमाण कमी व्हावं, या उद्देशाने ही माहिती समोर आली आहे.

समाजात बदनामी होईल या भीतीने...
अत्याचारास बळी पडलेल्या या कुमारी मातांची संख्या पाहता, महिला अत्याचाराचे वास्तव अजूनही बदनामीच्या भीतीने दडपले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

पालक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत
जिल्हा रूग्णालयात रोज किमान दोन अल्पवयीन मुली गर्भपातासाठी येतात, अनेक प्रकरणात मुलींच्या सहमतीने शरीर संबंध झालेले असतात.समाजात बदनामी होण्याच्या भीतीने पालकही तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, जोपर्यंत तक्रार केली जात नाही, तोपर्यंत कायद्यानुसार गर्भपातही करता येत नसल्याचं, अतिरिक्त शल्यचिकित्सक किरण पाटील यांनी म्हटलंय.

एक चिंतेचा विषय
जिल्ह्यात कुमारी मातांचं प्रमाण वाढलंय, हा एक चिंतेचा विषय आहे. याकडे गांभीर्याने पाहून, शाळेत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे, पालकांनी आपली नोकरी करतांना आपल्या मुलीसाठीही वेळ देण्याची गरज असल्याचं समाजसेविका रजनी पाटील यांनी म्हटलंय.

फसवणुकीला हजार कारणं
अनेक प्रकरणात मुलींना लग्नाचं आमीष दाखवून लैंगिक शोषण केलं जातं. युवतींना असलेल्या अज्ञानामुळे परिणामांची जाण नसते, गर्भवती झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं युवतींना कळतं.

विशेष म्हणजे शहरी भागात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात सर्वाधिक विभक्त कुटुंबांची संख्या आहे. यामुळे मुलीचा एकाकीपणा  वाढतो, हातात असलेला स्मार्टफोन, त्यातून सोशल नेटवर्कमधून मिळालेली अर्धवट, दिशाहीन चुकीची माहिती, किशोर वयातील शारीरिक आकर्षण, नोकरदार पालकांचे मुलींकडे दुर्लक्ष, त्यात शरीरातील बदलाकडे झालेले दुर्लक्ष ही कारणं अजाणतेपणीच मातृत्वास कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.

अशा फसवणूक झालेल्या मुलींना मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळते, मात्र शारीरिक आणि भावनिक नुकसान भरून निघू शकत नाही, म्हणून वेळीच यावर चर्चा होऊन, मुली, तसेच पालकांमध्ये जागृती होणे महत्वाचे आहे.

महिन्याभरात २५ कुमारी माता झाल्याने जिल्हा रूग्णालयातील प्रशासनही हळहळलंय. यात जागृती निर्माण करण्याची गरज अनेकांनी बोलवून दाखवली आहे.  कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हादाखल झाल्याशिवाय गर्भपात होत नसल्याने हतबल पालकांनी मध्यप्रदेश आणि सूरतची वाट धरली असल्याचंही सांगण्यात येतंय.

मनोधैर्य योजना 
बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात गंभीर आणि क्रूर स्वरूपात चेहरा विद्रूप झाल्यास, घटनेत कायमचे अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसदारांना ३ लाख रूपयांची आर्थिक मदत मिळते. तातडीच्या उपचारासाठी ५० हजार रूपये, तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर २ लाख रूपयांच्या ५० टक्के रक्कम मिळते, इतर रक्कम न्यायालयाता दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर चेकने दिली जाते.

गंभीर वास्तव
मनोधैर्य योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींमध्ये सर्वाधिक प्रमाण कुमारी मातांचं असल्याचं सांगण्यात येतंय.
प्रेमप्रकरणात फसवणूक झालेल्या १५ ते १७ वयोगटातील २७ मुलींचा यात समावेश आहे. 
चालू आर्थिक वर्षाक ३५ पीडितांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यात ४८ लाख रूपयांचा निधी वाटप झाला असून, ३० लाख ५० हजाराचा निधी प्रस्तावित आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.