शिवसेना - भाजप युतीत 'केमिकल लोच्या'!

कोकणातल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्येच 'केमिकल लोच्या' झालाय. शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानं पर्यावरणमंत्री रामदास कदम नाराज झालेत. तर कोकणातूनही या केमिकल झोनला तीव्र विरोध होतोय.

Updated: Aug 27, 2015, 09:46 AM IST
शिवसेना - भाजप युतीत 'केमिकल लोच्या'! title=
फाईल फोटो

प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकणातल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्येच 'केमिकल लोच्या' झालाय. शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानं पर्यावरणमंत्री रामदास कदम नाराज झालेत. तर कोकणातूनही या केमिकल झोनला तीव्र विरोध होतोय.

कोकणातल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या खाडी किनाऱ्यावर मरून पडलेल्या माशांचा खच दिसतोय. चिपळूणच्या लोटे माळावर २५ वर्षांपूर्वी आलेल्या केमिकल झोनमुळं इथल्या निसर्गाची काय अवस्था झालीय, ते यामुळे समोर येतंय. आता पुन्हा एकदा निसर्गरम्य कोकणात केमिकल झोन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानं खळबळ उडालीय.

उद्योग आणि पर्यावरण अशी दोन महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असताना, मुख्यमंत्र्यांनी परस्पर घोषणा करून सेनेवर कुरघोडी केल्याचं बोललं जातंय. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केलीय.

आधीच अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. आता कोणत्याही परिस्थितीत कोकणात केमिकल झोन होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
 
अन्य सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षही याविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. केमिकल झोन झाल्यास उरलासुरला निसर्गही धोक्यात येईल, अशी भीती कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू   डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केलीय. 

केमिकल प्रकल्पांनी चिपळूण आणि रायगडच्या खाड्यांसह समुद्र किनारे प्रदूषित केलेत... त्यामुळंच केमिकल झोनच्या विरोधात कोकणात वातावरण तापलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.