कोल्हापूर : काँम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला दुसरा आरोपी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेची ट्रॅक्स पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे. तर एसआयटीने सनातनच्या एका महिला साधकाला ताब्यात घेतले.
आशा ठक्कर असे या महिला साधकाचं नाव असून ती पेशाने डॉक्टर आहे. गोव्यातल्या सनातनच्या आश्रमातून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरुन ही महिला साधक नार्कोटिक्सची औषधे देत होती, अशी माहिती पुढे येत आहे.
वीरेंद्र तावडे याने खरेदी केलेल्या ट्रॅक्सचा वापर शस्र चालविण्याच्या ट्रेनिंगसाठी तावडे आणि त्याचे इतर सहकारी करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय. ही ट्रॅक्स यवतमाळमधून पोलिसांनी ताब्यात घेतलीय. पोलीस आता तावडेच्या टू व्हिलरचा शोध घेत आहेत.
ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणात एस.आय.टीच्या ताब्यात असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या तपासात अनेक बाबी नव्यानं समोर येत आहेत. वीरेंद्र तावडेच्या मालकीची ट्रॅक्स होती, आणि त्याची माहिती तावडेच्या पत्नीला नव्हती, असं पोलीस तपासात उघडीकला आले आहे.
तावडेच्या मालकीची एम.एच 09 व्ही 3345 या क्रमांकाची टू व्हिलर अजून पोलीसांना मिळालेली नाही. दरम्यान चेतना संस्थेवर परिणाम करणारी औषधे पनवेल इथल्या आश्रमात सापडली होती. या प्रकरणी एस.आय.टीने दोन महिला साधकांची कसून चौकशी केली आहे.