'केबीसी' घोटाळ्यानं अनेकांना गंडवलं, मुख्य आरोपी फरार

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. नाशिकमध्ये एका गुंतवणूकदार महिला परिचारिकेनं मुलासह आत्महत्या केल्यानंतर, नवा केबीसी घोटाळा उजेडात आलाय. याप्रकरणी एका पोलिसासह सहा जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार मात्र सिंगापूरला फरार झालाय. दुर्दैव म्हणजे या घोटाळ्याला पोलिसांचा आशीर्वाद लाभल्याचं बोललं जातंय.

Updated: Jul 15, 2014, 08:41 PM IST
'केबीसी' घोटाळ्यानं अनेकांना गंडवलं, मुख्य आरोपी फरार title=

नाशिक: पैसे दुप्पट करण्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. नाशिकमध्ये एका गुंतवणूकदार महिला परिचारिकेनं मुलासह आत्महत्या केल्यानंतर, नवा केबीसी घोटाळा उजेडात आलाय. याप्रकरणी एका पोलिसासह सहा जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार मात्र सिंगापूरला फरार झालाय. दुर्दैव म्हणजे या घोटाळ्याला पोलिसांचा आशीर्वाद लाभल्याचं बोललं जातंय.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या पुष्पलता निकम ही परिचारीका... निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या परिचारिकेनं आपल्या मुलासह विष पिऊन आत्महत्या केली. पंचवटीतील कुंभारवाड्यात राहणाऱ्या या परिचारिकेनं केबीसी या कंपनीत पैसे गुंतवले होते. मात्र कष्टानं कमावलेला पैसा लुबाडला गेल्यानं नैराश्येच्या भरात त्यांनी आत्महत्या केली.

पैसे दुप्पट होण्याच्या आमिषानं केबीसीत गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या पुष्पलता निकम एकट्याच नाहीत. त्यांच्यासारख्या लाखो गुंतवणूकदारांनी तब्बल अडीच हजार कोटी रुपये या कंपनीत गुंतवले होते. ती कुटुंबे आता उघड्यावर आलीत.

विशेष म्हणजे आडगाव पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूलाच केबीसीचं कार्यालय होतं. ही कंपनी कोट्यवधी रूपयांना लोकांना फसवणार, अशी लेखी तक्रार अनिल पाटील या आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञानं पोलिसांकडे केली होती. मात्र आडगाव पोलिसांनी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं. एका नातेवाईक पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीनं कंपनीचा सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण यानं पोलिसांचे हात ओले करून ठेवले होते, असाही आरोप केला जातोय.

केबीसी घोटाळ्याप्रकरणी संचालक बापूसाहेब चव्हाणसह तिघांना अटक करण्यात आलीय. मात्र घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण सिंगापूरला पळून जाण्यात यशस्वी झालाय. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर भाऊसाहेबलाही अटक झाली असती आणि गुंतवणूकदारांचा पैसाही परत मिळू शकला असता. 

दुर्दैवाची बाब म्हणजे रकमा दामदुप्पट करण्याच्या अशा फसव्या योजनांमध्ये अनेकांना आर्थिक फटका बसलाय. इमू, विकल्प कपालेश्वर तसंच इतर आर्थिक घोटाळ्यांमध्ये नागरिक गंडवले गेलेत. पण तरीही नव्या नावांनी अशा योजना सुरूच कशा राहतात? पोलिसांची समाजसेवा शाखा आणि गुप्तचर यंत्रणा झोपा काढत असते काय? असे प्रश्न निर्माण झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.