लातुरात धक्का देऊन १० लाखाची बॅग लांबवली

शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसात वाढली आहे. शहरातील उद्योग भवन परिसरातून १० लाख रुपयांची बॅग मोटारसायकल स्वारांनी भरदिवसा पळविली आहे. महाराष्ट्र बायो फर्टिलायजर्स या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बँकेतून काढलेली १० लाख रुपयांची ही रक्कम होती.  

Updated: Oct 25, 2016, 07:53 PM IST
लातुरात धक्का देऊन १० लाखाची बॅग लांबवली title=

लातूर : शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसात वाढली आहे. शहरातील उद्योग भवन परिसरातून १० लाख रुपयांची बॅग मोटारसायकल स्वारांनी भरदिवसा पळविली आहे. महाराष्ट्र बायो फर्टिलायजर्स या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बँकेतून काढलेली १० लाख रुपयांची ही रक्कम होती.  

उद्योग भवन परिसरातील चौकात कंपनीचा कर्मचारी आपल्या दुचाकीतील डिक्कीतून ही रक्कम काढून कंपनीत जाण्याच्या तयारीत होता. मात्र काही कळण्याच्या आत भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलस्वारांनी त्या कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन १० लाख रुपयांची रोकड पळविली. 

शिवाजी चौकातून आलेले दुचाकीस्वार रक्कम घेऊन जुन्या रेल्वे स्टेशन मार्गावरून पसार झाले. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. भरदुपारी ही घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान शहरात सतत होणाऱ्या या घटनेमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.