सैराटचे तिकीट न काढल्याने मित्रावर प्राणघातक हल्ला

सैराट या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळतंय. अनेक शो हाऊसफुल्ल असल्याने कित्येकांना तिकीटही मिळत नाहीये. या तिकीटाच्या वादावरुन ठाण्यात एका मुलावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडलीये. 

Updated: May 11, 2016, 01:46 PM IST
सैराटचे तिकीट न काढल्याने मित्रावर प्राणघातक हल्ला title=

ठाणे : सैराट या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळतंय. अनेक शो हाऊसफुल्ल असल्याने कित्येकांना तिकीटही मिळत नाहीये. या तिकीटाच्या वादावरुन ठाण्यात एका मुलावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडलीये. याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडी येथील रिमांड होममध्ये पाठवण्यात आलेय. 

पिडीत मुलगा कृष्णा उर्फ माँटी शिंदे याने आणि त्याच्या मित्रांनी गेल्या आठवड्यात सैराट पाहण्याचे ठरवले. शनिवारी दुपारी तीनच्या शोला ते जाणार होते. यावेळीही आपल्यालाही चित्रपट पाहायला यायचे अशी इच्छा अल्पवयीन आरोपीने व्यक्त केली. मात्र माँटी आणि त्याच्या मित्रांनी हे मनावर घेतले नाही. 

शनिवारी जेव्हा माँटी आणि सर्व मित्र चित्रपटासाठी जात होते. तेव्हा अल्पवयीन आरोपी तेथे आला आणि आपल्यासाठी तिकीट का घेतले नाही यावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. मारामारीही झाली. थोड्या वेळात भांडण संपल्यानंतर माँटी आणि मित्र चित्रपट पाहायला निघालेले असताना अल्पवयीन आरोपीने दुकानातून लोखंडी रॉड उचलला आणि माँटीच्या डोक्यावर मारले. 

माँटीच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. यानंतर याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.