वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

Updated: Oct 21, 2016, 12:07 AM IST
वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस title=

वर्धा : जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

वर्ध्यामध्ये 27 नोव्हेंबरला नगर परिषद निवडणुक होत आहे. नगर परिषदेवर आपलाच झेंडा फडकावा यासाठी प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केलीय. वर्धा जिल्ह्यात वर्धा, आर्वी, सिंदी रेल्वे, देवळी, पुलगाव आणि हिंगणघाट या सहा नगरपरिषद असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या ताब्यात प्रत्येकी दोन नगरपरिषद आहे. 

वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून नगराध्यक्ष त्यांचा आहे मात्र इथं भाजपचा उपाध्यक्ष आहे. वर्ध्यात आमदार पंकज भोयर आणि खासदार रामदास तडस भाजपचा असल्यामुळे या निवडणुकीत नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुखांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. 

आर्वी नगरपरिषदमध्ये भाजपची एक हाती सत्ता असून यंदाही भाजप आपलं वर्चस्व राखेल असा विश्वास पक्षातून व्यक्त होतोय. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार दादाराव केचे आणि काँग्रेस आमदार अमर काळेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

पुलगाव नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता असून आमदार रणजीत कांबळेंनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवलंय. मात्र विकासकामं झाली नसल्यानं सत्ता बदलाची शक्यता नाकारता येत नाही. 

देवळी नगर परिषदेत गेल्या 32 वर्षांपासून भाजपनं आपली सत्ता टिकवून ठेवलीय.  खासदार रामदास तडस आणि जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांचं हे होमटाऊन असल्यानं भाजपला याठिकाणी शह देणं इतर पक्षांना तेवढं सोपं नाही. 

सिंदी रेल्वे नगर परिषदमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आहे. मात्र यंदा दोन्ही पक्षांची एकला चलो रे ची भूमिका असल्यानं त्याचा फायदा याठिकाणी भाजपला होऊ शकतो.

हिंगणघाटचा विचार केला असता याठिकाणी समीर कुणावार हे भाजपचे आमदार आहे. नगरपरिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. याठिकाणी प्रमुख लढत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असेल. 

मतदानाला एक महिनाच उरल्यान निवडणुकीसाठी वर्ध्यातील राजकारणात घोडामैदान तेजीत आहे. उमेदवारीसाठी वरिष्ठांपासून नवख्यापर्यंत आपलं नशीब अजमावत आहेत.