पुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांची सत्ता येनकेन प्रकारे उलथवून टाकण्यासाठी सरसावलेला भाजप, पक्षाचा बालेकिल्ला राखण्याच्या इर्षेनं पेटून उठलेला राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या वेळच्या यशाची आशा बाळगून असलेला मनसे, अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असलेला काँग्रेस; 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 11, 2017, 05:11 PM IST
पुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांची सत्ता येनकेन प्रकारे उलथवून टाकण्यासाठी सरसावलेला भाजप, पक्षाचा बालेकिल्ला राखण्याच्या इर्षेनं पेटून उठलेला राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या वेळच्या यशाची आशा बाळगून असलेला मनसे, अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असलेला काँग्रेस; 

आणि स्वाभिमानाची बात करत सत्ताकारणाच्या चक्रव्यूहात अडकलेला शिवसेना; या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. पुण्याचा कारभारी कोण हा कोटीमोलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

सध्याचे राजकीय बलाबल 

राष्ट्रवादी काँग्रेस - ५२
मनसे - २९
काँग्रेस - २८
भाजप - २६
शिवसेना - १५
रिपाइं - २

निवडणुकीचा ज्वर चढला

२०१२ च्या महापालिका निवडणुकीचा हा निकाल...त्यामुळे शहरात सत्ता कुणाची हे वेगळं सांगण्याची गरज नाही.  
आता मात्र परिस्थिती बदललीय. यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागलय.     
पुण्यामध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत असतानाच निवडणुकीची तारीख जाहीर झालीय. त्यामुळे यापुढच्या काळात शहरातील वातावरणाला वेगळाच ज्वर चढणार आहे. 

पुण्यात भाजपची हवा

 पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड प्रमाणे एकहाती सत्ता मिळावी ही अजित पवारांची इच्छा होती. मात्र सध्या देशात सर्वत्र खास करून महाराष्ट्रात भाजपची हवा आहे. अशावेळी अजित पवारांची इच्छा पूर्ण होणार का याबद्दल साशंकता आहे. 

भाजप विरोधात ठोस मुद्दा नाही

एकतर लोकसभा , विधानसभा निवडणुकांत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला राज्य तसेच केंद्रातील भाजप सरकारनं शहरातील पीएमआरडीए, विकास आरखडा, मेट्रो , रिंग रोड यांसारख्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिलीय. किमान तसं वातावरण तरी आहे. त्याचा परिणाम राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्या क्षमतांवर संभवणार आहे. काँग्रेस मध्ये तर सामूहिक नेतृत्वाच्या नावाखाली पक्षाची वाताहत सुरु असल्याचं चित्र आहे. आजी- माजी नगरसेवकांचं ओउटगोईंग दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सध्यातरी या दोन्ही पक्षांकडे निवडणुकीसाठी म्हणून नोटाबंदीच्या मुद्याशिवाय दुसरा कुठला ठोस मुद्दा नाहीये.  

मनसेची गोची 

गेल्या वेळी महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या मनसेची यावेळी मोठी अडचण झालीय. पक्षातील अनेकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोडचिट्ठी दिलीय. मागील पाच वर्ष हा पक्ष अंतर्गत कलहान ग्रासला होता. पक्षप्रमुख राज ठकरे यांची पकडही याठिकाणी काहीशी ढिली झाल्याचं दिसून आलं. या सगळ्याचा परिणाम पक्षाला यावेळच्या निवडणुकीत भोगावा लागणार आहे. 

विनायक निम्हणांचा कस लागणार 

मनसेच्या काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत केलेली कामं निश्चितच उल्लेखनीय आहेत. ती शहर पातळीवर कितपत फायद्याची ठरतात हे पाहावं लागेल. पुण्यात शिवसेनेची तयारी चांगली आहे. मागील काही महिन्यांत म्हणजे घरवापसी केलेले माजी आमदार विनायक निम्हण यांच्याकडे शहराचं नेतृत्व आल्यानंतर, त्यांनी पक्षांतर्गत मरगळ घालवण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणूक स्वबळावर लढणवण्याची भाषा करत सैनिकाचा स्वाभिमान जागृत ठेवण्याचा प्रयत्न सेनेनं केलाय. पण तेवढं पुरेसं नाहीये. शहरात आपली ताकत नेमकी किती याचं भान सेनेला ठेवावं लागणार आहे. आता वळूया भाजपाकडे...  पुण्याकडे सीएम, पीएम दोघांचंही लक्ष आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार संजय काकडे यांच्यावर मोठीच जबाबदारी असल्याचं दिसतंय. यावेळी तब्बल ११०० जणांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. हा एकप्रकारे विक्रमच आहे.          

त्यामुळेच कदाचित सध्या हा पक्ष जणूकाही सत्ता आल्याच्याच अविर्भावात वावरतोय. पक्षासाठी वातावरण पोषक असलं तरी सारं काही म्हणावं तितकं सोपं नाही. आजही या पक्षाला बहुतेक ठिकाणी उमेदवार आयात करावे लागत आहेत. त्यांच्या जोरावर गेल्या वेळच्या २६ वरून ८१ वर जाण्याचा या पक्षाचा मनसुबा आहे. आणि इतकं  करून यश नाही मिळालं तर त्यापेक्षा मोठी नामुष्की नाहीये. 

प्रभाग पद्धतीने निवडणुकीचे समिकरण बदलले

पुण्यातील यावेळची निवडणूक ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होणार आहे. एकूण १६२ जागांसाठी ही  निवडणूक होत आहे.  सुमारे ३५ लाख लोकसंख्येचं भवितव्य त्यातून ठरणार आहे. कुणाची युती होणार आणि कुणाची आघाडी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. उमेदवार निश्चितीनंतर उद्भवणाऱ्या समस्या निराळ्याच... नेहमीप्रमाणे आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी यावेळीही झडणार आहेत. पवारांचा पॉवर गेम चालणार का याबद्दल उत्सुकता आहे. असो... पुणे महापालिकेची यावेळची निवडणूक कुणासाठी प्रतिष्ठेची तर कुणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कुणाच्या वाट्याला काय येतं हे पुढच्या महिन्यात कळणार आहे ...