सावधान : तुमचीही मुलगी ट्रेननं एकटीने प्रवास करते?

एकट्या दुकट्या मुलीनं ट्रेननं प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं... बारावीत शिकणाऱ्या बदलापूरच्या एका मुलीला याचा भयानक अनुभव ठाणे स्थानकात आला... 

Updated: Jun 1, 2016, 11:06 PM IST
सावधान : तुमचीही मुलगी ट्रेननं एकटीने प्रवास करते? title=

कपिल राऊत, ठाणे : एकट्या दुकट्या मुलीनं ट्रेननं प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं... बारावीत शिकणाऱ्या बदलापूरच्या एका मुलीला याचा भयानक अनुभव ठाणे स्थानकात आला... 

जो धक्कादायक अनुभव या मुलीला आला, तो तुमच्या मुलीच्या बाबतीतही येऊ शकतो. ठाण्यातील खासगी क्लासमध्ये बारावीला शिकणारी ही मुलगी दररोज बदलापूरहून अपडाऊन करते. मंगळवारी संध्याकाळी साडे सात - आठच्या सुमारास क्लास संपवून ती घरी निघाली होती. त्याच वेळी गजबजलेल्या ठाणे स्टेशनवर तिला एका तोतया टीसीनं गाठलं. सॅटीस पुलावर त्यानं या मुलीला हटकलं. ऑफिसमध्ये येऊन साहेबांशी बोल... म्हणत तिला तो सॅटीस पुलावरून खेचून घेऊन जात होता... पण, मुलीनं आपला हात सोडवून कसाबसा तिथून पळ काढला.  

मुलीचे वडीलही धास्तावले

आपल्या मुलीवर ही वेळ आल्यानंतर तिच्या वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी झालं... घाबरलेल्या अवस्थेत ते पोलिसांकडे गेले... पण बेदरकार पोलीस पायावर पाय ठेवून बसून राहिले, असं सांगताना त्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते.

तोतया टीसीनं जबरदस्ती केल्यानंतरही या बहादूर मुलीनं जी हिंमत दाखवली ती कौतुकास्पद आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या, गर्दीच्या ठाणे स्टेशनात अशी घटना घडत असेल तर मुली खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो...