भोंदू बाबांनो खबरदार, जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यसरकारनं वटहुकूमाद्वारे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय. वटहुकूमावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 24, 2013, 09:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्यसरकारनं वटहुकूमाद्वारे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय. वटहुकूमावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केलीय.
गेली १४ वर्ष राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा, अशी मागणी होत होती. परंतू, गेल्या मंगळवारी या कायद्यासाठी लढणारे आणि जनजागृती करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा बळी गेला आणि जनक्षोभ लक्षात घेऊन राज्यसरकारनं बुधवारी या कायद्यासाठी वटहुकूम जारी केला होता.
विधेयक पास करायचं असेल तर डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर अधिवेशनाची वाट पाहावी लागली असती. पण, जनक्षोभ लक्षात घेता राज्यसरकारनं जादूटोणाविरोधी कायद्यासाठी वटहुकूम काढला होता. याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वटहुकूमावर कायद्यावर स्वाक्षरी केली होती पण, केवळ त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली नव्हती. आज राज्यपालांनी या वटहुकूमावर स्वाक्षरी केलीय. आता नियमानुसार सहा महिन्यात या वटहुकूमाचं कायद्यात रूपांतर करावं लागणार आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात जादुटोणा विरोधी विधेयक राज्य सरकारकडून मांडलं जाईल.

राज्यात ऐतिहासिक ‘जादूटोणाविरोधी कायदा’ लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.