कल्याण येथे धावत्या रेल्वेवर दगड भिरकवल्याने प्रवासी जखमी

धावत्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर दगड भिरकावण्याचे प्रकार कितीही उपाय योजना केल्या तरी थांबत नाहीत. कल्याणच्या पत्रीपूलाजवळ या घटनेची पुनरावृत्ती शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. 

Updated: Nov 13, 2016, 05:26 PM IST
कल्याण येथे धावत्या रेल्वेवर दगड भिरकवल्याने प्रवासी जखमी title=

कल्याण : धावत्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर दगड भिरकावण्याचे प्रकार कितीही उपाय योजना केल्या तरी थांबत नाहीत. कल्याणच्या पत्रीपूलाजवळ या घटनेची पुनरावृत्ती शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. 

रमेश शर्मा असं या प्रवाशाचं नाव आहे. त्याच्यावर सायन येथीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रमेश शर्मा हे कल्याण येथील एका इमारत उभारणीच्या प्रकल्पात नोकरी करतात. संध्याकाळी कामावरून परतत असताना कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान त्यांच्या दिशेने मोठा दगड आला. दगडाच्या जोरदार फटकाऱ्याने त्यांच्या जबड्याला मोठी जखम झाली.

इतर प्रवाश्यांनी त्यांना मदत करून डोंबिवली स्थानकावर उतरविले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, या दरम्यान रक्तप्रवाह जास्त झाल्याने अखेर नातलगांनी त्यांना मुंबईत हलविले. त्यांच्या जबड्याचे हाड मात्र तुटले आहे. सध्या शर्मांची प्रकृती सुधारत आहे. मात्र अशा प्रकारे रेल्वेवर दगड फेकणा-यांना तातडीनं पकडून त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.