...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!

तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय. 

Updated: Oct 22, 2016, 11:32 AM IST
...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!  title=

अश्विनी पवार, पुणे : तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय. 

बारामतीची १९ वर्षीय अर्शिया... तिला ८ महिन्यांचं गोंडस बाळही आहे. मात्र घरगुती वादातून तिच्या पतीने तिला तीन वेळा तलाक लिहून पाठवलं आणि क्षणात अर्शियाच्या स्वप्नांचा जणू चुराडाच झाला. कोणतंही कारण न देतात तिच्या पतीने तिला तलाक देण्याचा निर्णय घेतला. तलाक देताना ना बाजू ऐकून घेण्यात आली ना चिमुकल्या बाळाचा विचार करण्यात आला.

कुटुंबीयांची साथ मिळाली म्हणून...

शरीयतनुसार निकाह झाल्याने हा तलाक मान्य करावाच लागेल, असं तिला सांगण्यात आलं. मात्र एकतर्फी तलाक म्हणजे अन्याय असल्याचे सांगत अर्शियानं हा तलाक अमान्य केलाय. पतीने तलाकनामा लिहून पाठवल्यानंतर तो मान्य करण्यासाठी समाजानं दबाव टाकल्याचा आरोपही अर्शियानं केलाय. मात्र, या कठीण समयी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं ठाकलं ते तिचं कुटुंब... 

समाजाकडून पदरी निराशा आल्यानं अर्शियानं न्यायासाठी मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचा नंबर मिळवला. त्यासाठी तिनं थेट बारामतीहून पुणे गाठलं. या संस्थेच्या अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनीही अर्शियावरील अन्यायाची दखल घेत तिला पाठिंबा दर्शवलाय.

कुठेतरी हे थांबायलाच हवं

एकतर्फी तलाकसारख्या सक्तीच्या प्रथा आणि परंपरांमुळे देशातल्या अनेक महिला पिचून निघतायत. यातून मुक्त होण्यासाठी गरज आहे ती अन्यायाला वाचा फोडण्याची... धार्मिक बंधनांमुळे अशा गोष्टींबाबत कुणी बोलण्यास धजावत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही अर्शियानं दाखवलेलं धाडस नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल.