याकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन?

धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी झाल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच दफन करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन करू शकतो. याकूब मेमनच्या फाशी आता धार्मिक मुद्दा बनला आहे. 

Updated: Jul 27, 2015, 08:13 PM IST
याकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन? title=

पुणे : धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी झाल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच दफन करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन करू शकतो. याकूब मेमनच्या फाशी आता धार्मिक मुद्दा बनला आहे. 

मेल टुडेच्या रिपोर्ट नुसार, जेल प्रशासन मेमनचा मृतदेह त्याचा परिवाराला न देता तो जेलमध्येच दफन करण्याच्या तयारी करीत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण न होऊ देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

जेल प्रशासनाने सांगितले की, याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करणार नाही. पण याकूबची पत्नी रहीन आणि मुलगी जुबेदा त्याच्या अंत्यसंस्कारात सामील होऊ शकते. 

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला दफन करण्याची जागाही निश्चित करण्यात आली आहे. ही जागा जेल परिसरात आहे. दरम्यान, मृत शरीर त्याच्या कुटुंबियांना देण्यात यावे यासाठी मेमन याचे वकील या निर्णयाच्या विरोधात अपील करणार आहे. 

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात फाशीची शिक्षा झालेला एकमेव गुन्हेगार याकूब अब्दुक रजाक मेमन यांच्या माफीच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. या याचिकेवर सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे. 

न्यायालयाने सुधारात्मक याचिकेच्या नियमांवर अटर्नी जनरल यांचे स्पष्टीकरण मागितले आहे. मेमन आपल्या अर्जात नमूद केले की नियमांवर निर्णय होण्यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याकूबला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. 

मुंबईत १२ मार्च १९९३ मध्ये १३ ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये २५७ जण ठार झाले होते. तर ७०० पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.