मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता?

राज्यातील १० महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांची मतमोजणी एकाच दिवशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्याचा निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी तसे संकेत दिले आहे.

Updated: Jan 4, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यातील १० महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांची मतमोजणी एकाच दिवशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्याचा निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी तसे संकेत दिले आहे.

 

महापालिका आणि झेडी यांच्या मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. तसेच त्याचे निकाल जाहीर होण्याच्या तारखाही वेगळ्या आहेत. सुरूवातीला झेडपीचा निकाल लागणार असून नंतर महापालिकेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे निकाल वेगवेगळ्या दिवशी जाहीर केल्याने नंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी करण्यात यावी अशी मागणी भाजपतर्फे आमदार विनोद तावडे यांनी केली होती.

 

या संदर्भात भाजप-शिवसेनेचे एक शिष्टमंडळ राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांची भेट घेण्यासाठी आज गेले होते. त्यावेळी त्यांनी ही मागणी आयुक्ताकडे केली. त्यावेळी सत्यनारायणन यांनी भाजपाची मागणी स्वीकार्ह असल्याचे सांगितले तसेच वोटिंग मशीन उपलब्ध झाल्यास मतमोजणी एकाच दिवशी होऊ शकते, असेही संकेत दिले. परंतु, यासाठी हैदराबाद येथे संपर्क साधून अधिक मशीन उपलब्ध होण्यासंदर्भात माहिती घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

 

तसेच मशीन उपलब्ध झाल्या नाही तर मतपत्रिकेद्वारे मतदान करावे अशी सूचनाही भाजपतर्फे करण्यात आली. त्यावर यावरही विचार करण्यात येईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले.